Congress : तांबे कुटुंबाला सन्मानाने पक्षात घेणार; विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदासाठी काँग्रेसची खेळी

कोल्हापूरचे सतेज पाटील विरोधीपक्ष नेतेपद मिळवण्यासाठी आग्रही

125
Congress : तांबे कुटुंबाला सन्मानाने पक्षात घेणार; विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदासाठी काँग्रेसची खेळी
Congress : तांबे कुटुंबाला सन्मानाने पक्षात घेणार; विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदासाठी काँग्रेसची खेळी

नाशिक पदवीधर निवडणुकीवेळी निलंबित करण्यात आलेल्या तांबे कुटुंबियांना पुन्हा सन्मानाने पक्षात घेण्याच्या हालचाली काँग्रेसमध्ये सुरू झाल्या आहेत. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेतेपद मिळवण्याचा हेतू त्यामागे असून, कोल्हापूरचे सतेज पाटील त्यासाठी आग्रही आहेत.

नाशिक पदवीधर निवडणुकीत पक्षाचा एबी फॉर्म मिळूनही सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्याऐवजी चिरंजीव सत्यजितला त्यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरवले आणि जिंकूनही आणले. त्यामुळे पक्षाच्या निर्णयाविरोधात गेल्याने सुधीर आणि सत्यजित तांबे या दोघांनाही काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. तांबे कुटुंबीय बाळासाहेब थोरात यांचे नातेवाईक असल्याने नाना पटोले या कारवाईसाठी आग्रही होते.

मात्र, आता सत्यजित आणि सुधीर तांबेंना पुन्हा सन्मानाने पक्षात घेण्यासाठी काँग्रेस तयारी करीत आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेतेपद मिळवण्याचा हेतू त्यामागे आहे. सध्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे या पदावर आहेत. मात्र, नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे आणि विप्लव बाजोरिया यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंना पाठिंबा दिल्यामुळे ‘उबाठा’ गटाचे संख्याबळ ११ वरून ८ पर्यंत खाली आले आहे.

सध्या काँग्रेसचे संख्याबळही ८ इतके आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांची साथ मिळाल्यास विधानपरिषदेतील संख्याबळ ठाकरे गटापेक्षा अधिक होणार आहे. त्यामुळे विरोधीपक्ष नेतेपदावर दावा करणे सोपे जाईल, असे वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तांबे कुटुंबियांना पुन्हा सन्मानाने पक्षात घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

(हेही वाचा – IND vs WI T20I : ‘कधी कधी हरणं चांगलं असतं,’ असं कर्णधार हार्दिक पांड्या का म्हणाला?)

सतेज पाटील आग्रही

अंबादास दानवे यांना विरोधकांची बाजू सक्षमपणे मांडता येत नसल्याने, त्यांना बदलावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. अशावेळी विरोधीपक्ष नेतेपद ताब्यात घेण्याची संधी मिळाल्यास काँग्रेस ती सोडणार नाही. त्यामुळे विधानपरिषदेतील गणिते बदलण्याआधीच या पदावर दावा सांगण्याची तयारी काँग्रेसकडून केली जात आहे. कोल्हापूरचे सतेज पाटील या पदासाठी आग्रही आहेत. पक्षातूनही त्यांना अनुकूल वातावरण आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.