‘सरकार तिघांचं मग नाव का फक्त दोघांचं’

152

विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला सर्वाधिक 105 जागा मिळूनही शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. सरकार स्थापन होऊन बरेच महिने उलटले असले तरी देखील या तिघाडी सरकारमध्ये अजूनही आलबेल नसल्याचेच समोर येत आहे. आता तर स्थानिक पातळीवरील वाद देखील चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. ठाण्यामध्ये तर नाराज काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा फलक लावत सरकार तिघांचं मग नाव का फक्त दोघांचं असा प्रश्न शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विचारला आहे. ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी हा बॅनर लावला आहे.

तर सरकार सत्तेवर आलेच नसते

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसने लावलेल्या या बॅनर्सवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा भला मोठा फोटो लावत राष्ट्रवादी आणि शिवसेनेला काँग्रेसने प्रश्न विचारले आहेत.  सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला नसता तर जनकल्याण करणारे ठाकरे सरकार, महाराष्ट्रात सत्तेवर आले असते का? असा सवालच काँग्रेसने विचारला आहे.

म्हणून ठाण्यात ‘पोस्टर वॉर’

मंत्रीमंडळाच्या बैठकीत MMR क्षेत्रात असलेल्या ८ महानगरपालिका आणि ७ नगरपालिका स्वतंत्र SRA प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करणारा एक बॅनर स्लम डेव्हलपर्स आणि आर्किटेक्ट असोसिएशनने तीन हात नाक्यावर लावला आहे. या बॅनरवर “ठाकरे सरकारची वचनपूर्ती” असे म्हणत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो लावला आहे. याच बॅनरवर स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा देखील फोटो लावण्यात आलेला आहे .मात्र, या बॅनरवर एकनाथ शिंदे आणि आव्हाड यांचा मोठा फोटो लावण्यात आला असून, थोरात यांचा फोटो छोटा लावण्यात आल्यामुळे काँग्रेसचे स्थानिक नेते नाराज झाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.