भाजपच्या प्रीतम मुंडेंकडून राज्य सरकारच्या कामाचे कौतुक! म्हणाल्या…

96

सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारवर भाजपचे नेते टिकास्त्र सोडत असतात. असे असताना मात्र नुकतेच भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी राज्य सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे. कोरोना महामारीच्या काळात भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजपने राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, दुसरीकडे भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी कोरोनादरम्यान राज्य सरकारने चांगले काम केले आहे, असे म्हणत आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे कौतुक केले आहे.

काय म्हणाल्या प्रीतम मुंडे?

बीडमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने माध्यमांशी बोलत असताना प्रीतम मुंडे यांनी पहिल्यांदाच राज्य सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे. यावेळी भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या, राज्य सरकारच्या कामाविषयी म्हणाल, तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे खरंच मनापासून कौतुक करते. त्यांनी फार चांगल्या पद्धतीने कोरोनाचा विषय हाताळलेला आहे, असे कौतुक उद्गार प्रीतम मुंडे यांनी काढले. कोरोनाच्या  काळात राज्य सरकारने चांगले काम केले आहे. विशेषतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मी कौतुक करते. राजकीय मंचावर येऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचे विषय वेगळे असतात. आरोग्य हा असा विषय आहे की त्यामध्ये कोरोनाचा सामना करत असताना केंद्र सरकार ज्या पद्धतीने सर्तक होते आणि सतत लोकांची काळजी घेण्याचे काम करत होते. तसेच राज्य सरकारने सतर्क राहून कार्य केले.

(हेही वाचा – राज ठाकरेंना धमकी! केंद्र सरकार देणार सुरक्षा )

… हे निश्चितच निराशाजनक आहे

राज्यात सुरू असलेल्या भोंग्याच्या मुद्यावरून मुंडे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी राज ठाकरेंना खडेबोल सुनावले. प्रीतम मुंडे यांनी देशात वाढत्या चाललेल्या धार्मिक तेढबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, महाराष्ट्र हे देशातील मोठे राज्य आहे. येथे लोकसंख्या दाट आहे. अनेक स्थलांतरित कामगार सुद्धा इथे आहेत. या सगळ्यांकडे लक्ष देत असताना महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने काम झालेले आहे. धर्मा-धर्मामध्ये दुही निर्माण होते हे निश्चितच निराशाजनक आहे. त्यामुळे येथे कोणाविषयी बोलण्याचे कारण नाही. पण या गोष्टी अगोदर आपल्या समाजात गुण्यागोविंदाने नांदत होत्या. पण अचानक आलेली ही विषमता निश्चितच अस्वस्थ करणारी आहे. आजचा हा विषय नसला तरी सर्वच राजकीय पक्षांना या विषय तोडगा काढावा लागेल असेही त्या म्हणाल्यात.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.