प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वावटळ उठवणाऱ्या एका मोठ्या चर्चेला अखेर ‘प्रहार’ जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू(Bachchu Kadu)यांनी पूर्णविराम दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आपला पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन करणार आणि स्वतः विधान परिषदेवर आमदार म्हणून जाणार, अशा वावड्या उठत होत्या. या सर्व चर्चांवर आज बच्चू कडू यांनी आपल्या खास शैलीत कडाडून प्रहार केला असून, “एका आमदारकीसाठी प्रहार पक्ष विलीन करायला बच्चू कडू एवढा नालायक नाही,” अशा तिखट शब्दांत त्यांनी विरोधकांचे आणि चर्चा करणाऱ्यांचे कान टोचले आहेत.(Bachchu Kadu)
(हेही वाचा – UAE OPEC Fallout : ओपेक, ओपेक प्लसमधून युएईचा काढता पाय; तेल बाजारावर काय होणार परिणाम? )
बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की, विलीनीकरणाचा कोणताही अधिकृत प्रस्ताव त्यांच्याकडे आलेला नाही. “विलीनीकरणाच्या बातम्या केवळ माध्यमातून समजल्या. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी फोनवर ओझरती चर्चा झाली होती, पण त्यात कोणतीही स्पष्टता नव्हती,” असे सांगत त्यांनी सध्या सुरू असलेल्या वावड्या फेटाळून लावल्या. विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत बोलताना त्यांनी मिश्किल टिप्पणी केली की, “फॉर्म भरण्यासाठी अजून कोणताही फोन आलेला नाही; कागदपत्रे नेहमी बॅगेतच असतात, पण याचा अर्थ असा नाही की मी स्वाभिमान गहाण ठेवला आहे.”(Bachchu Kadu)
यावेळी बच्चू कडू यांनी आपल्या राजकीय संघर्षाची आठवण करून देताना सांगितले की, प्रहार ही संघटना कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करून उभी केली आहे. लाखो दिव्यांग आणि सामान्य जनता या संघटनेशी जोडलेली आहे. “मी मुळचा शिवसैनिकच आहे, पण शिवसेनेतून बाहेर पडून कोणाच्याही पाठिंब्याशिवाय प्रहार मोठी केली. आजचे राजकारण केवळ धर्म आणि जातीवर चालत असून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला डावलले जात आहे,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. बच्चू कडू यांच्या या रोखठोक भूमिकेमुळे तूर्तास तरी प्रहारचे अस्तित्व कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले असून, महायुतीमधील ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढवण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.(Bachchu Kadu)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

