Shivsena : विभाग प्रमुखावर गुन्हा दाखल होताच उबाठा गट आक्रमक 

87

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिवसेनेच्या (Shivsena) दोन गटात झालेल्या राड्याचे पडसाद पुन्हा एकदा उमटताना दिसत आहे. शिवसेना उबाठा गटाचे विभागप्रमुख महेश सावंत यांच्यावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर उबाठा गट हा आक्रमक झाला आहे. उबाठा गटाच्या पदाधिकारी यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात शिंदे गटा विरोधात तक्रार अर्ज दाखल केले आहे. उबाठा गटाच्या महिला पदाधिकारी यांच्यासोबत शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप या अर्जामध्ये करण्यात आलेला आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात जवळपास १० ते १२ तक्रार अर्ज दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

५० ते ६० अज्ञात व्यक्ती जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबर रोजी स्मृती दिन शिवाजी पार्क येथील स्मृती स्थळावर पार पडला. मात्र स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला १६ नोव्हेंबर रोजी स्मृती स्थळावर शिवसेनेचे (Shivsena) उबाठा आणि शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते समोरासमोर आले, घोषणाबाजीवरून दोन्ही गटात तुफान राडा झाला होता. दुसऱ्या दिवशी शिवाजी पार्क पोलिसांनी या राड्याप्रकरणी सरकारच्या वतीने ५० ते ६० अज्ञात व्यक्ती जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला होता. सर्व प्रकरण शांत झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून उबाठा गटाचे विभागप्रमुख महेश सावंत यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सावंत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

(हेही वाचा Aaditya Thackeray : परस्पर डिलाईल रोड पुलाचे उद्घाटन करणारे आदित्य ठाकरे त्याच पुलाच्या शासकीय उदघाटन कार्यक्रमाला हजेरी लावणार का?)

उबाठा गटाच्या महिलासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप 

सावंत यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे कळताच उबाठा गट आक्रमण झाला असून उबाठा गटाच्या पदाधिकारी यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात मंगळवारपासून शिंदे गटाविरुद्ध तक्रार अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात बुधवारपर्यंत उबाठा गटाच्या पदाधिकारी यांच्याकडून १० ते १२ तक्रार अर्ज दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उबाठा गटाच्या एका महिला पदाधिकारी यांनी आपल्या तक्रार अर्जात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. उबाठाकडून देण्यात आलेल्या इतर लेखी तक्रार अर्जात शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उबाठा गटाच्या महिलासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून तक्रार अर्जावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नसून तपास सुरू असल्याचे एका अधिकारी यांनी म्हटले आहे.

  • तक्रारदाराचे काय म्हणणे आहे? मी शिवाजी पार्क पोलिसांना तक्रार दिली आहे. मला धमक्या आल्या. मी घाबरणार नाही. शिवसेना एक कुटुंब आहे. पोलिसांनी वेळ मागितला आहे.  – गुर्शीन कौर सहानी, युवासेना
  • सदा सरवणकर यांनी माझी ओढणी खेचली. सदा सरवणकर यांनी माझा विनयभंग केला. – रेणुका विचारे
  • सरवणकर यांनी गोळीबार केला हा फॉरेन्सिक रिपोर्ट असताना कारवाई झाली नाही. सरवणकर यांच्या मुलीने धमकी दिली तरी कारवाई झाली नाही. ही तिसरी वेळ आहे. आताही पोलीस तक्रार घ्यायला तयार नाही. उद्यापर्यंत वाट बघणार, नाहीतर आम्ही करायचं ते ठरवू. वारंवार अन्याय सहन करणार नाही. – विशाखा राऊत
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.