Ajit Pawar : उद्धव ठाकरेंसमोर जाऊन रडा; अजित पवारांनी सुषमा अंधारेंना सुनावले

सुषमा अंधारे यांच्या या तक्रारीला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले, यानंतर मात्र सुषमा अंधारे या बॅकफूटवर आल्या.

172

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना थेट विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविषयी शरद पवार यांच्याकडे तक्रार केली होती. आमदार अश्लाघ्य पद्धतीने माझ्यावर बोलत होते, पण विरोधी पक्षनेत्यांनी त्यावर काहीच भाष्य केले नाही, अशी खंत सुषमा अंधारे यांनी शरद पवारांसमोर व्यक्त केली. सुषमा अंधारे यांच्या या तक्रारीला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले, यानंतर मात्र सुषमा अंधारे या बॅकफूटवर आल्या.

काय म्हणाले अजित पवार?

सुषमा अंधारे कोणत्या पक्षात आहेत? शिवसेना ठाकरे गटात. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे आहेत ना? तिकडे पवार साहेबांकडे रडण्यापेक्षा, तिथे भावनिक होण्यापेक्षा ते ज्या पक्षाचे काम बघत आहेत, ज्या पक्षाकरता बाबा रे, काका रे, मामा रे, म्हणतायत आणि सभा घेत आहेत, त्यांनी एवढा अजित पवारांचा उल्लेख करण्यापेक्षा, त्या ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाच्या विरोधी पक्षाच्या नेत्याला सांगायला पाहिजे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याला जेवढा अधिकार आहे, तेवढाच अधिकार विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याला आहे. त्यांना सांगा तिकडे रडण्यापेक्षा उद्धव ठाकरेंकडे रडल्या असत्या आणि अंबादास दानवेंना तो मुद्दा उपस्थित करायला सांगितला असता, तर जास्त योग्य ठरले असते, असा टोला अजित पवारांनी लगावला.

(हेही वाचा The Kerala Story : इस्लामिक धर्मांतराबाबत विशाली आणि अनघा जयगोपाल यांनी सांगितली त्यांची ‘story’)

सुषमा अंधारे यांची माघार

अजित पवारांच्या या टीकेवर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. मी दादांचा अजिबात उल्लेखच केला नाही, विरोधी बाकांवरच्या सगळ्याच लोकांसाठी ते अपेक्षित घराणे आहे. दादा तुम्ही आमच्या हक्काचे आहात, तुम्ही आमच्या जवळचे आहात. तुमच्याजवळ आम्ही अत्यंत आपुलकीने बोलतो. महाविकास आघाडीतला अत्यंत ज्येष्ठ नेता म्हणून बोलतो. त्यादिवशी आपल्या नावाचा उल्लेख नव्हता, पण आमच्याजवळ का बोलता, असे म्हणून आम्हाला पारखे करू नये. दादा आमच्यासाठी फार हक्काचे आहेत, आमच्याजवळचे आहेत, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. त्या कार्यक्रमात मी दादांच्या नावाचा उल्लेखच केलेला नाही. ज्या सभागृहाची सदस्य नाही, त्या सभागृहात माझ्या वतीने कुणीतरी बोलावे आणि विरोधी नेत्यांनी बोलावे. विरोधी नेते एकटे दादा आहेत का? दादांची तक्रार केली ही माध्यमांनी केलेल्या बातम्या आहेत. ही अपेक्षा सगळ्यांकडून आहे. आमच्या उपसभापती असणाऱ्या नीलमताईंकडूनही ती अपेक्षा आहे, असे वक्तव्य सुषमा अंधारेंनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.