अबब…दहिसर, वालभट/ओशिवरा नदीच्या शुद्धीकरणावर १३०० कोटी रुपये

दहिसर आणि वालभट/ओशिवरा नदीतील प्रदुषणास अटकाव व आळा बसावा तसेच परिसरातील रहिवाशांचे आरोग्य व राहणीमान सुधारण्यासाठी महापालिकेच्यावतीने नदीच्या पुनरुज्जीवीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.

115

मिठी नदीनंतर आता दहिसर आणि ओशिवरा/वालभट नदीतील प्रदुषण रोखण्यासाठी सांडपाणीला अटकाव केला जाणार आहे. या नदीवर आता अत्याधुनिक पध्दतीचे मलनि:सारण प्रक्रिया केंद्र उभारुन मलवाहिनीतील पाणी त्यात फिरवले जाणार आहे. तसेच पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात येणार असून या दोन्ही नदींचे पुनरुज्जीवनासाठी तब्बल विविध करांसह १३०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून केवळ चर्चा असलेल्या या प्रकल्पांसाठी अखेर कंत्राटदारांची निवड झालेली असल्याने आता या नदींना मूळ स्वरुप प्राप्त होणार आहे.

महापालिकेचा नदी पुनरुज्जीवीकरणाचा प्रस्ताव तयार 

दहिसर आणि वालभट/ओशिवरा नदीतील प्रदुषणास अटकाव व आळा बसावा तसेच परिसरातील रहिवाशांचे आरोग्य व राहणीमान सुधारण्यासाठी महापालिकेच्यावतीने नदीच्या पुनरुज्जीवीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या कामांची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असल्याने नद्यांचे सौंदर्यीकरण व पुनरुज्जीवीकरण आदींच्या कामांसाठी टंडन अर्बन सोल्युशन या कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक केली होती. त्यांनी सादर केलेल्या अहवालामध्ये नदीच्या काठावर असलेल्या वसाहतींमधून येणाऱ्या सांडपाण्याला रोखण्यासाठी नदीलगतच्या पोहोच रस्त्यावर मलनि:सारण वाहिनी टाकून उदंचन(पंपिंग स्टेशन) केंद्रापर्यंत सांडपाणी वाहून नेणे, नदी लगतच्या झोपडपट्ट्यांमध्ये मलनि:सारण वाहिनी टाकणे शक्य नसल्याने झोपडपट्टीमधून नदीमध्ये येणाऱ्या सांडपाण्यास प्रतिबंध करण्यासाठी इंटरसेप्टर बसवणे आणि नव्याने बनवण्यात येणाऱ्या मल प्रक्रिया केंद्रात वळवणे. तसेच मलजल प्रक्रिया केंद्रामध्ये प्रक्रिया केलेले पाणी पावसाळ्याव्यतिरिक्त पुनश्च नदीमध्ये सोडून नदी प्रवाहित ठेवणे, नदीच्या काठांवर जेथे उपलब्ध नसेल तिथे पोहोच रस्ता बनवणे व पोहोच रस्त्याखाली मलनि:सारण वाहिनी टाकणे आदी कामांसाठी निविदा मागवण्यात आली होती.

(हेही वाचा : अमित शहा म्हणजे गजनी… शिवसेना खासदाराची टीका)

३७६.०५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार!

यामध्ये दहिसर नदी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथे उगम पाहून पुढे ती धोबीघाट, पश्चिम द्रुतगती महामार्गाखालून संजय नगर, दौलत नगर, दहिसर गावठाण, लिंक रोड पुलाहुन मनोरी खाडीत विसर्जित होते. या नदीच्या काठावर व परिसरातील वसाहती, झोपडपट्ट्या व सोसायट्यांमधील मलमिश्रित सांडपाणी नदीत सोडण्यात येते. या नदीमध्ये परिसरातील श्रीकृष्ण नगर व आंबेवाडी तबेल्यातील शेणमिश्रित पाणी कोणत्याही प्रक्रियेविना सोडले जातात. शिवाय धोबीघाटातून प्रदुषित पाणी येत असल्याने नदीच्या काठावर २ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारणे व हे मलजल प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर पुढील १५ वर्षे चालवणे, त्यांची देखभाल करणे, दुरुस्ती करणे आदींसाठी निविदा मागवण्यात आली होती. यामध्ये एस.के.-एस.पी असोशिएट्स ही कंपनी पात्र ठरली असून या कामांसाठी ३७६.०५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

शेणमिश्रित पाणी कोणत्याही प्रक्रियेविना नदीमध्ये सोडण्यात येतात!

तर वालभट नदी आरे टेकडी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उगम पावते आणि आरे कॉलनीतून वाहत पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम रेल्वे ओलांडून पुढे एस.व्ही.रोड गोरेगाव पश्चिम येथे ओशिवरा नदीला मिळते. त्यानंतर ओशिवरा/वालभट नदीचे लिंक रोड ओलांडून मालाड खाडीमध्ये विसर्जित होते. या नदीला संतोष नगर नाला, रॉयल पाम, बिंबीसार नगर नाला, नंदादीप नाला, नेस्को नाला, मजास नाला, फेअरडील नाला, इंडियन ऑईल नाला, ज्ञानेश्वर नगर नाला, बेस्ट नाला इत्यादी नाले मिळतात. या परिसरातील मलमिश्रित सांडपाणी आणि तबेल्यांमधील शेणमिश्रित पाणी कोणत्याही प्रक्रियेविना नदीमध्ये सोडण्यात येतात. या नदीवर पाच ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारले जाणार असून देखभाल, दुरुस्ती आदी कामांसाठी इगल-महालसा जेव्ही कंपनी पात्र ठरली असून यावर ९२८.४६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

दहिसर नदी

  • एकूण लांबी : १३ मीटर
  • एकूण रुंदी :  ३० मीटर ते ४५ मीटर
  • नदीच्या रुंदीकरणाचे व संरक्षक भिंतीचे काम : ९० टक्के
  • नदीपर्यंतच्या पोहोच मार्गाचे काम : ७० टक्के
  • नदीतील सांडपाणी रोखून मलजल प्रक्रियेत सोडण्याचा खर्च : ३७६.०५ कोटी रुपये
  • निविदेत पात्र ठरलेले कंत्राटदार : एस.के-एस.पी असोशिएट्स
  • सल्लागाराचे नाव : टंडन अर्बन सोल्यूशन

वालभट/ओशिवरा नदी

  • एकूण लांबी : ७.३१० मीटर
  • एकूण रुंदी :  १० मीटर ते ६९ मीटर
  • नदीतील सांडपाणी रोखून मलजल प्रक्रियेत सोडण्याचा खर्च : ९२८.४६ कोटी रुपये
  • निविदेत पात्र ठरलेले कंत्राटदार : इगल-महालसा (जे.व्ही)
  • सल्लागाराचे नाव : टंडन अर्बन सोल्यूशन
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.