Air Force : प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 25 महिलांसह एकूण 213 कॅडेट्सची भारतीय वायू दलाच्या विविध विभागांमध्ये नियुक्ती

125

भारतीय वायू दलाच्या (Air Force) जमिनीवरील आणि उड्डाण करणाऱ्या विविध विभागांमध्ये नियुक्तीसाठी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 213 कॅडेट्सचे दीक्षांत समारंभातील संयुक्त संचलन तेलंगणातील दुंडिगल इथे वायू दल अकादमीत 17 डिसेंबर 2023 रोजी झाले. संचलनाला उपस्थित संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सना प्रेसिडेंट कमिशनही बहाल केले. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांमध्ये 25 महिलांचा समावेश आहे. भारतीय नौदलातील आठ अधिकारी, नऊ भारतीय तट रक्षक आणि मित्र राष्ट्रांमधील दोघांनी उड्डाणाचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल ‘विंग्ज’ प्रदान करण्यात आले.

नव्या संकल्पना, नवोन्मेषी विचार आणि आदर्शवादाला जागण्याचे आवाहन

संरक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणात नवनियुक्त अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि उत्तम प्रकारे संचलन केल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली. नव्या संकल्पना, नवोन्मेषी विचार आणि आदर्शवादाला कायम जागण्याचे आवाहन राजनाथ सिंह यांनी जवानांना केले. संरक्षण दलांच्या परंपरा काळाच्या कसोटीवर उतरलेल्या आहेत हे लक्षात घेऊन त्यांना महत्त्व द्यावे, असे सांगून आंधळेपणाने परंपरांचे पालन करत राहिल्यास व्यवस्थेमध्ये जडत्व येते, याकडे संरक्षण मंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. हे टाळण्यासाठी सतत बदलत राहणाऱ्या काळाबरोबर राहण्यासाठी परंपरा आणि नवोन्मेष यांच्यात संतुलन साधले जावे, असा सल्ला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. आपल्याला डबक्याचे रूप येऊ नये तर नदीसारखे प्रवाहीपण आपल्यात राहावे याकरता परंपरा आणि नवोन्मेष यांच्यातील संतुलन अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले. उड्डाणे करताना उंची जरूर गाठावी परंतु पाया जमिनीवर भक्कम ठेवा, असेही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

(हेही वाचा Sam Manekshaw : १९७१च्या युद्धात पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या सॅम माणेकशॉ यांचा काँग्रेसने थांबवला होता ३० वर्षे पगार)

वायू दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी संरक्षण मंत्र्यांचे स्वागत केले. संरक्षण मंत्र्यांसमोर जनरल सॅल्युट संचलन आणि मार्च पास्ट सादर करण्यात आली. पदवीधरांना संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते ‘स्ट्राईप्स’ देण्याचा कमिशनिंग समारंभ संचलनाचे आकर्षण ठरला. अकादमीच्या कमांडंटमार्फत नवनियुक्त अधिकाऱ्यांना शपथ देण्यात आली. संचलन समारंभात पिलाटस पीसी-7 एमके II, हॉक व किरण आणि चेतक हेलिकॉप्टर्सच्या प्रदर्शनाचाही समावेश होता. अकादमीतील विविध विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या प्रशिक्षणार्थींना संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. फ्लाईंग ऑफिसर अतुल प्रकाश यांना विमानउड्डाण अभ्यासक्रमातील सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेसिडेंट्स प्लाक आणि चीफ ऑफ द एअर स्टाफ स्वोर्ड ऑफ ऑनर देण्यात आले. फ्लाईंग ऑफिसर अमरींदर जीत सिंह यांना जमिनीवरील विभागांतील सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेसिडेंट्स प्लाकचा मान देण्यात आला. रविंद्रनाथ टागोर यांच्या ‘आनंदलोक’च्या स्वरांवर स्लो मार्च करून नवनियुक्त अधिकाऱ्यांनी संचनल पूर्ण केले. हवाई प्रदर्शनात सु-30एमकेI, सारंग व सूर्यकिरण पथकांनी शानदार कामगिरी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.