Mumbai Crime : गणेशोत्सवाच्या उत्साहात घाटकोपर पूर्वेकडील कामराज नगर परिसर एका रक्तरंजित थराराने हादरला आहे. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याला विनाकारण मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी मंडळाचे अध्यक्ष राजेश राजेंद्रन देवेंदर (वय ३५) यांची भररस्त्यात छातीत चाकू भोसकून निर्घृण हत्या केली. या घटनेत हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आनंद तिवारी या तरुणावरही चाकूने वार करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी मुख्य आरोपी रौनक बाळू सोनावणेसह सात जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राजेश देवेंदर हे कामराज नगर येथील ‘सेव्हन स्टार स्पोर्ट्स क्लब’च्या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष होते. तसेच त्यांच्या घरीही पाच दिवसांचा घरगुती गणपती विराजमान होता. शुक्रवारी (१८ सप्टेंबर) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आरोपी रौनक बाळू सोनावणे याने बीएमसी शाळेसमोरील गणेश मंडळाचा कार्यकर्ता विनय शर्मा याच्या कानशिलात लगावली. या घटनेची माहिती मिळताच राजेश देवेंदर हे मंडपात पोहोचले.
राजेश यांनी रौनक याला जाब विचारत लहान मुलांवर हात न उचलण्याचा सल्ला दिला. त्यावेळी झालेल्या शाब्दिक वादानंतर आरोपी रौनकने फोन करून आपल्या इतर साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले.
(हेही वाचा – अग्निसुरक्षा नसलेल्या ११ पीजी, रुग्णालये आणि हॉस्टेलवर कारवाई, Pune Municipalityच्या ‘फायर ऑडिट’ मोहीमेत धक्कादायक प्रकार उघड )
काही वेळातच आकाश सोनावणे, अक्षय सोनावणे, अश्विन उनवणे, श्रेयस, बबलू आणि स्टीफन नाडर उर्फ अण्णा हे सर्व आरोपी त्या ठिकाणी जमा झाले. त्यांनी राजेश यांच्याशी वाद घालत शिवीगाळ व मारहाण सुरू केली. यावेळी “आज इस साले का किस्सा ही खतम करते है” असे म्हणत आकाश आणि अक्षय यांनी राजेश यांचे दोन्ही हात आणि कॉलर पकडली, तर अश्विन याने त्यांना पाठीमागून धरून ठेवले. त्याच वेळी रौनक सोनावणे याने खिशातून धारदार चाकू काढून थेट राजेश यांच्या छातीत डाव्या बाजूला खुपसला.
राजेश रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळताच आरोपी महामार्गाच्या दिशेने पळू लागले. त्यांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आनंद तिवारी याच्या कमरेवरही रौनकने चाकूने वार केले आणि सर्व आरोपी पसार झाले.
गंभीर जखमी झालेल्या राजेश यांना तात्काळ दुचाकीवरून राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर खात्रीसाठी त्यांना घाटकोपर येथील पांचोली रुग्णालयात नेण्यात आले असता, तेथील डॉक्टरांनीही त्यांना मृत घोषित केले.
भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल
याप्रकरणी मयत राजेश यांच्या मेहुणी दिप्ती राजू पिल्लई (वय ३५) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मुख्य आरोपी रौनक सोनावणे, आकाश सोनावणे, अक्षय सोनावणे, अश्विन उनवणे, श्रेयस, बबलू आणि स्टीफन नाडर यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३(१) (हत्या), ११८(१), ११८(२) (घातक शस्त्राने दुखापत), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १८९(४), १९०, १९१(२), १९१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील तुकाराम चव्हाण करत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

