कुर्ल्यात सरकारी कंत्राटदारावर गोळीबार; परिसरात खळबळ

134
एका सरकारी कंत्राटदारावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री कुर्ला पश्चिम येथे घडली. या गोळीबारात कंत्राटदार आणि त्यांचा मित्र थोडक्यात बचावले असून याप्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात गोळीबार करणाऱ्या दोन अनोळखी व्यक्तीसह चौघांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हाडाच्या कामाचे टेंडरमागे घेण्याच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून, पुढील तपास कुर्ला पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा करीत आहे.
सुरजप्रतापसिंग नरपतसिंग देवडा (३४) असे हल्ल्यात बचावलेल्या सरकारी कंत्राटदाराचे नाव आहे. दहिसर पूर्व येथे राहणारे सुरज प्रतापसिंग यांची धरम कन्ट्रक्शन कंपनी असून या कंपनीकडे मोठ्या प्रमाणात सरकारी कामाचे कंत्राटे आहेत. म्हाडाकडून वांद्रे ते दहिसर फुटपाथ, नाल्याचे, पायवाटा कामाचे टेंडर काढण्यात आले आहे. सुरजप्रताप सिंग यांच्या धरम कन्ट्रक्शन या कंपनीने हे टेंडर भरले असून त्याची अनामत रक्कमदेखील भरलेली आहे.
सोमवारी सुरजप्रताप सिंग हे पंकज नावाच्या मित्रासोबत स्वतःच्या क्रेटा या मोटारीने कुर्ला पश्चिम मनपाच्या एल कार्यालयात आले होते. तेथून उशिरा काम आटोपून रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दहिसरकडे जाण्यासाठी आपल्या क्रेटा या मोटारीने कुर्ला सांताक्रूझ रोडने जात असताना कापाडिया नगर या ठिकाणी दोन अनोळखी इसमानी त्यांची मोटार अडवून एकाने सुरजप्रताप सिंग यांच्यावर रिव्हॉल्वर रोखून त्यातून एक गोळी झाडली. सुदैवाने ती गोळी मोटारीला लागली. घाबरलेल्या सुरजप्रताप यांनी आपली मोटार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता दुसऱ्या इसमाने त्यांच्या मोटारीच्या बोनेटवर हाताने जोरजोरात मारून मोटार थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरजप्रताप यांनी मोटार न थांबवता वाकोलाच्या दिशेने मोटार पळवली. अनोळखी इसमानी त्यांच्या मोटारीचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला.
त्यानंतर सुरजप्रताप सिंग हे वाकोला पोलीस ठाण्यात पोहचले व त्यांनी त्यांच्यावर हल्लाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तोपर्यंत कुर्ला पोलीस ठाण्याचे अधिकारीदेखील घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचे स्थळ कुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळे कुर्ला पोलिसांनी सुरजप्रताप यांची तक्रार नोंदवून घेतली.
म्हाडाचे टेंडर भरल्यानंतर सूरज प्रताप सिंग यांचा चुलत भाऊ विरेंद्र सिंग देवडा यांच्या मोबाईलवर डिसेंबर महिन्यात समिर सावंत व गणेश चुगल यांचा फोन आला व त्यांनी त्याला सुरजप्रतापने भरलेले म्हाडाचे  टेंडर पाठीमागे घ्यावे व त्याकरता मोबदला म्हणून काही रक्कम देण्यात येईल असे धमकावले होते. ही बाब वीरेंद्र यांनी सूरज यांना सांगितली परंतु त्यांना ते मान्य नसून ते टेंडर मागे घेणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर १५ दिवसांपूर्वी  गणेश चुगल याने व्हॉटअप कॉन्फरस कॉलवर सूरज यांना घेऊन धमकी दिली की, मी दिलेला सौदा मान्य करा अन्यथा ” दुनिया गोल है हम जल्द ही मिलेंगे ” असे धमकावले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी  समिर सावंतच्या ओळखीचा येरूनकर  या व्यक्तीने सूरज यांना कॉल करून टेंडर मागे घे अशी धमकी दिली होती.अशी माहिती सुरजप्रताप सिंग यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात समीर सावंत,गणेश चुगलसह गोळीबार करणारे असे एकूण चौघांविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि हत्यारबंद कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.