- कल्याण : प्रतिनिधी
कल्याण पूर्वेत एका पादचारी गृहिणीला रस्त्यात अडवून दोघा भामट्यांनी बोलण्यात गुंतवून तिच्या जवळील सोन्याचा ऐवज लुटून नेला. या महिलेला या भामट्यांनी एक मारवडी स्वखुशीने ज्येष्ठ नागरिकांना साड्या आणि किराणा वाटप करत आहे. गरीब दिसाव्यात म्हणून आपण गळ्यातील सोन्याचा ऐवज काढून जवळील पिशवीत ठेवा, अशी दिशाभूल करत या भामट्यांनी ९० हजार रूपयांचा ऐवज लुटून नेला. या प्रकरणी गुन्हा नोंदवून कोळसेवाडी पोलिसांनी (Kolshewadi Police) दोघा भामट्यांचा शोध सुरू केला आहे. (Kalyan News)
(हेही वाचा – उरलेला उबाठा गट मतदारच BMC Elections मध्ये संपवतील; नवनाथ बन यांचा जोरदार हल्लाबोल)
सत्यवती पालाटी (५३) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून त्या कल्याण पूर्वेतील चिंचपाडा रोडला असलेल्या कन्हैय्या धाम बिल्डिंगमध्ये कुटुंबीयांसह राहतात. खासगी नोकरी करणाऱ्या सत्यवती (Satyavati Palati) या बुधवारी संंध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास काटेमानिवली भागातील बंद असलेल्या महा ई सेवा केंद्राच्या जवळून पायी चालल्या होत्या. इतक्यात दोघा अनोळखी इसमांनी गळ्यात सोन्याचे दागिने पाहून त्यांना अडविले. सत्यवती पालाटी त्यांंना टाळून पुढे जाऊ लागल्या. मात्र भामट्यांनी डाव साधला. या भागात एक मारवाडी स्वखुशीने ज्येष्ठ नागरिकांना साडी आणि किराणा सामान वाटप करत आहे. आपणासही साडी आणि किराणा सामान आम्ही मिळून देतो. त्यासाठी आपण आपले गळ्यातील सोन्याचे दागिने काढून जवळील पिशवीत ठेवा. अन्यथा आपणास ते सामान मिळणार नाही, असे भामट्यांनी सांगितले. या गडबडीत दोन्ही भामट्यांनी बोलण्यात गुंतवून सत्यवती यांना भुरळ घातली. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे ९० हजार रूपये किमतीचे दागिने काढून घेऊन ते हातात गुंडाळी करून देत असल्याचा भास केला. मात्र हात चलाखीने ते दागिने सत्यवती यांच्या पिशवीत न ठेवता स्वत:कडे घेतले. काही अंतरावर पुढे गेल्यावर दोन्ही भामट्यांनी तेथून पळ काढला. दोघेही पसार झाल्यानंतर सत्यवती यांनी आपला सोन्याचा ऐवज लुटून नेल्याचे लक्षात आले. त्यांनी परिसरात त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत भामटे दूरवर पसार झाले होते. या प्रकरणी सत्यवती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून फरार भामट्यांचा शोध सुरू केला आहे. (Kalyan News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

