-
कल्याण, प्रतिनिधी
Kalyan Fraud कल्याण पूर्व परिसरात एटीएममधून पैसे काढताना ग्राहकांना लक्ष्य करत चार भामट्यांनी तब्बल १ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एटीएम फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाल्याची ग्राहकांमध्ये चर्चा आहे. पुना लिंक रस्त्यावरील सलगर शॉप सेंटर येथील एचडीएफसी बँकच्या एटीएममध्ये नंदकिशोर रमेश पाटील आणि वैभव प्रकाश आव्हाळे हे पैसे काढत होते. त्यावेळी चार जण ग्राहक असल्याचे भासवत एटीएममध्ये आले. (Kalyan Fraud)
(हेही वाचा – Kalyan : माणुसकीला काळिमा, अज्ञात वाहनाखाली चिरडून श्वान मादी ठार; मृतदेहाजवळ पिल्लांच्या घिरट्या)
या भामट्यांनी हातचलाखी करत संबंधित ग्राहकांचे एटीएम कार्ड मशीनच्या खाचेत अडकवून ठेवले. कार्ड बाहेर येत नसल्याने गोंधळलेल्या ग्राहकांना आम्ही मदत करतो, असे सांगून त्यांनी कार्ड काढून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्राहकांकडून गुप्त पिन क्रमांक विचारून घेतला. गुप्त पिन क्रमांक मिळताच भामट्यांनी त्याच कार्डचा वापर करून संबंधितांच्या खात्यातून रक्कम काढली आणि तेथून हळूच काढता पाय घेतला. काही वेळाने खात्यातून पैसे वळते झाल्याचे लक्षात आल्यानंतर ग्राहकांना आपली फसवणूक केल्याची खात्री पटली. (Kalyan Fraud)
(हेही वाचा – 10th Board Exam : दहावीच्या विद्यार्थिनीला नाकारला प्रवेश; नेमकं प्रकरण काय?)
याच टोळीने पुढे खडेगोळवली परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्येही समान प्रकार केला. यशवंत हिरामण मगरे हे संध्याकाळी एटीएममधून पैसे काढत असताना चार जण आत आले. या चौकडीने पुन्हा एकदा एटीएम कार्ड खाचेत अडकवून मदतीच्या बहाण्याने गुप्त पिन क्रमांक मिळवला आणि खात्यातील रक्कम काढून घेतली. या तिन्ही ग्राहकांची मिळून एकूण १ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी नंदकिशोर पाटील यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, कल्याण पूर्व भागात एटीएम फसवणुकीची टोळी सक्रिय असल्याने ग्राहकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. (Kalyan Fraud)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

