रेल्वे स्थानक, विमानतळ, मॉल किंवा कॅफेमध्ये मोफत वाय-फाय दिसताच अनेकजण क्षणाचाही विलंब न करता मोबाईल कनेक्ट करतात. इंटरनेट मोफत मिळत असेल तर त्याचा वापर करण्याचा मोह होणे स्वाभाविक आहे. मात्र, मुंबईतील एका ताज्या सायबर फसवणुकीच्या घटनेने सार्वजनिक वाय-फायच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर एका बँक अधिकाऱ्याला मोफत वाय-फायच्या वापराने लाखोंचा फटका बसला आहे.(CSMT Wifi Hacked)
नेमकं काय घडलं?
एका बँकेच्या मॅनेजरच्या क्रेडिट कार्डवरून त्यांच्या परवानगीशिवाय ४.२७ लाख रुपयांचे व्यवहार करण्यात आले. पोलिस तपासात धक्कादायक बाब समोर आली. प्राथमिक तपासानुसार, संबंधित बँक अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक सचिवाने CSMT स्थानकावरील मोफत वाय-फायशी मोबाईल कनेक्ट केला होता. सायबर गुन्हेगारांकडून त्यांच्या फोनवर मालवेअर (व्हायरस) पाठवून मोबाईल हॅक करण्यात आला.(CSMT Wifi Hacked)
यानंतर हॅक झालेल्या मोबाईलमधून आरटीओच्या (RTO) बनावट चलनाच्या नावाखाली एक APK फाइल फोनमधील कॉन्टॅक्ट लिस्टमधील अनेक व्यक्तींना पाठविण्यात आली. यामध्ये वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांचाही समावेश होता. अशाप्रकारे हा मालवेअर एका मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलमध्ये पसरत गेला आणि अखेरीस बँक अधिकाऱ्यांची बँक खाती रिकामी झाली.(CSMT Wifi Hacked)
मोफत वाय-फाय वापरणे किती धोकादायक?
प्रत्येक मोफत वाय-फाय नेटवर्क धोकादायकच असते, असे नाही. रेल्वे स्थानके, विमानतळ, हॉटेल्स किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेले अधिकृत वाय-फाय नेटवर्क सामान्यतः वापरण्यासाठी सुरक्षित असते. मात्र, कोणतीही खातरजमा न करता अनोळखी किंवा बनावट Wi-Fi नेटवर्कशी जोडणे किंवा सार्वजनिक नेटवर्कवर बँकिंग, ऑनलाइन पेमेंट, पासवर्ड टाकणे यांसारखी संवेदनशील कामे करणे धोकादायक ठरू शकते.(CSMT Wifi Hacked)
तुमच्या फोनवर APK फाईल आल्यास काय करावे?
जर तुम्हाला व्हॉट्सॲप किंवा एसएमएसवर अचानक एखादी एपीके फाईल मिळाली, तर ती इन्स्टॉल करू नका. जर ती फाईल आरटीओ, बँक, वीज विभाग किंवा कोणत्याही सरकारी सेवेच्या नावाने आली असेल, तर संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाइट किंवा ॲपवरून माहिती तपासा. अनोळखी व्यक्तीने पाठवलेली एपीके उघडण्याचा प्रयत्नही करू नका. आणि जर तुम्ही चुकून एखादी एपीके इन्स्टॉल केली असेल, तर ही गोष्ट हलक्यात घेऊ नका. इंटरनेट बंद करणे, संशयास्पद ॲप काढून टाकणे, महत्त्वाचे पासवर्ड बदलणे आणि तुमच्या बँक किंवा कार्डशी संबंधित हालचालींवर लक्ष ठेवणे यांसारखी तात्काळ पावले उचला. गरज पडल्यास बँकेलाही कळवा.(CSMT Wifi Hacked)
सायबर गुन्हेगार अनेकदा अधिकृत नेटवर्कसारखेच नाव असलेले बनावट (Fake) Wi-Fi नेटवर्क तयार करून वापरकर्त्यांना त्यात अडकवतात. अशा नेटवर्कशी मोबाईल जोडल्यास तुमच्या ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवले जाऊ शकते किंवा मालवेअरद्वारे वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते. त्यामुळे केवळ ‘Free Wi-Fi’ असे लिहिले आहे म्हणून कोणत्याही नेटवर्कशी जोडण्यापूर्वी त्याची अधिकृतता पडताळणे अत्यंत आवश्यक आहे.(CSMT Wifi Hacked)
Join Our WhatsApp Community

