Boxing News : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या वतीने दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे २१ आणि २२ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ठाणे ग्रामीण जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत ‘महाराष्ट्र मिलिटरी स्कूल, मुरबाड’च्या खेळाडूंनी देदीप्यमान यश संपादन केले आहे. १४ आणि १७ वर्षांखालील वयोगटात चमकदार कामगिरी करत या शाळेच्या विद्यार्थ्यांनी १२ सुवर्ण, ६ रौप्य आणि ६ कांस्य अशी एकूण २४ पदके पटकावून स्पर्धेवर आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. सुवर्णपदक विजेत्या सर्व खेळाडूंची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
(हेही वाचा – UPI MDR, Nirmala Sitharaman : युपीआय शुल्कावरून वादावर अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण; ‘हा कर किंवा उपकर नाही’ )
या स्पर्धेत शाळेच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच तांत्रिक कौशल्य आणि आक्रमक खेळाचे दर्शन घडवत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. बॉक्सिंग प्रशिक्षक संदेश गपाट यांनी अल्पावधीत विद्यार्थ्यांकडून करून घेतलेल्या कसून सरावाच्या आणि योग्य रणनीतीच्या जोरावर हे घवघवीत यश मिळाले आहे. या दमदार विजयामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरातून खेळाडूंचे कौतुक होत आहे.
खेळाडूंच्या या ऐतिहासिक यशाबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, कार्यवाह रणजित सावरकर, कोषाध्यक्ष सुरेश जाधव, शाळा व्यवस्थापक देवेंद्र गंद्रे, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेच्या प्राचार्या किशोरी भोईर, सर्व क्रीडा प्रशिक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी खेळाडूंचे व मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

