Uttarakhand च्या शाळेत धक्कादायक प्रकार; मोबाईलमुक्तीच्या नावाखाली नेमकी काय घडली घटना? 

18

उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातील खतिमा येथे एका नामांकित प्राथमिक शिक्षण संस्थेमध्ये अजब आणि तितकाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांना मोबाईच्या अतिवापरापासून परावृत्त करण्यासाठी शाळेने अत्यंत भीतीदायक मार्ग अवलंबला. या विचित्र प्रात्यक्षिकामुळे वर्गातील लहान मुले प्रचंड घाबरून रडू लागली आणि वर्गात एकच गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात असून स्थानिक प्रशासनाने या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. (Uttarakhand)

(हेही वाचा – India UNSC Permanent Seat : भारताच्या स्थायी सुरक्षा परिषद सदस्यत्वाला ४ युरोपीयन देशांचा पाठिंबा, संयुक्त राष्ट्रसंघात मोठ्या सुधारणांचे संकेत)

डोळे काढल्याचा खोटा देखावा
विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने शिक्षकांनी एका बालकाच्या डोळ्यांना वैद्यकीय पट्ट्या बांधल्या आणि त्यावर रक्तासारखा भासणारा लाल द्रव लावून जखम झाल्याचा देखावा उभा केला. या मुलाने इतर विद्यार्थ्यांना सांगितले की, सतत मोबाईलकडे बघून गेम खेळल्यामुळे डॉक्टरांनी त्याचे दोन्ही डोळे काढून टाकले आहेत. हा प्रकार पाहताच वर्गातील लहान मुले थरथर कापू लागली, काहींना रडू कोसळले आणि मुलांनी हात जोडून अशा उपकरणांना पुन्हा कधीही स्पर्श न करण्याची शपथ घेतली.

प्रशासनाकडून चौकशी सुरू
लहान वयातील मुलांच्या कोवळ्या मनावर अशा भयानक प्रयोगांमुळे गंभीर मानसिक परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पालकांनी आणि सोशल मिडियावरील नागरिकांनी शाळा व्यवस्थापनाच्या या असंवेदनशील वृत्तीवर जोरदार आक्षेप घेतला. या प्रकरणाची व्याप्ती वाढल्यानंतर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा अमानुष आणि भीतीदायक पद्धतींचा अवलंब करणाऱ्या संबंधितांवर अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

(हेही वाचा – राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC Smart Card नोंदणीसाठी आता नवा पर्याय उपलब्ध)

कोवळ्या मनावर आघात करणारे प्रयोग टाळण्याचा सल्ला
उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाला कडक शब्दात समज दिली असून लहान मुलांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करणारे कोणतेही उपक्रम राबवू नयेत, अशी ताकीद दिली आहे. डिजिटल माध्यमांचा मर्यादित वापर शिकवण्यासाठी भीतीचा नव्हे तर सकारात्मक समुपदेशनाचा मार्ग अवलंबायला हवा, असा सल्ला शिक्षणतज्ज्ञांनी दिला आहे. या प्रकरणाच्या सविस्तर तपासणीनंतर शाळेवर काय पावले उचलली जातात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.