महिनाभरात ५ लाख Tribal Students ची आरोग्य तपासणी; रोज १६ हजारांहून अधिक मुलांचे स्क्रीनिंग, मनुष्यबळाचे मोठे आव्हान

15
महिनाभरात ५ लाख Tribal Students ची आरोग्य तपासणी; रोज १६ हजारांहून अधिक मुलांचे स्क्रीनिंग, मनुष्यबळाचे मोठे आव्हान
  • प्रतिनिधी

Tribal Students             राज्यातील शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळा आणि खासगी शाळांमधील सुमारे पाच लाख आदिवासी विद्यार्थ्यांची अवघ्या एका महिन्यात सर्वकष आरोग्य तपासणी करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आदिवासी विकास विभागाने निश्चित केले आहे. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा सप्ताह’ आणि विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या उपक्रमाची घोषणा केली आहे. मात्र, केवळ ३० दिवसांच्या कालावधीत पाच लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी दररोज १६ हजारांहून अधिक मुलांची तपासणी करावी लागणार असल्याने, एवढ्या मोठ्या प्रमाणावर आवश्यक असणारे वैद्यकीय मनुष्यबळ, काटेकोर नियोजन आणि प्रत्यक्ष तपासणीची गुणवत्ता यावर वैद्यकीय वर्तुळातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Tribal Students)

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या महिनाभराच्या कालावधीत सुट्ट्या वगळता प्रत्यक्ष कामकाजाचे दिवस २५ ते २७ धरल्यास, हे दैनंदिन प्रमाण सुमारे १८,५०० ते २० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकते. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या (RBSK) अधिकृत मार्गदर्शक तत्त्वांनुसार एका वैद्यकीय पथकाला दिवसाला साधारण ११० ते १२० विद्यार्थ्यांचे शास्त्रोक्त स्क्रीनिंग करणे शक्य होते. या प्रमाणाचा ताळेबंद मांडल्यास, प्रतिदिन १६,६६७ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासाठी राज्यामध्ये दररोज किमान १३९ ते १५२ वैद्यकीय पथकांची अखंड उपस्थिती आवश्यक ठरणार आहे. एका पथकात साधारण दोन वैद्यकीय अधिकारी, एक एएनएम (ANM) आणि एक औषधनिर्माता (फार्मासिस्ट) असतात; त्यानुसार केवळ तपासणी प्रक्रियेसाठीच दररोज सुमारे २८० ते ३०४ डॉक्टर्स आणि तितकेच सहाय्यक कर्मचारी मैदानावर उतरावे लागतील. (Tribal Students)

(हेही वाचा – Iran US Conflict 2026 : होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यास इराणचा नकार; अमेरिकेसमोर ठेवल्या ‘या’ अटी)

ही मोहीम केवळ औपचारिक ताप किंवा रक्तदाब मोजण्यापुरती मर्यादित नसून, ‘चार D’-जन्मजात दोष (Defects at birth), विविध आजार (Diseases), पोषणातील कमतरता (Deficiencies) आणि विकासात्मक अपंगत्व (Developmental delays)-यांचे वेळेत निदान करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांची दृष्टी, श्रवण, दंतआरोग्य, त्वचारोग, श्वसनविकार, रक्तक्षय आणि वाढीतील अडथळे बारकाईने तपासण्यासाठी प्रति विद्यार्थी पुरेसा वेळ देणे अनिवार्य आहे. संख्यात्मक उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या नादात एकाच पथकाकडून दररोज २०० ते ३०० विद्यार्थ्यांचे उथळ परीक्षण झाल्यास निदानाच्या अचूकतेवर पाणी फिरू शकते. त्यामुळे केवळ आकड्यांची जुळवाजुळव न करता संशयास्पद बाबी आढळणाऱ्या विद्यार्थ्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी (Referral) संदर्भित करणे अधिक महत्त्वाचे ठरेल. (Tribal Students)

आदिवासी विकास विभागाच्या संकेतस्थळानुसार राज्यात ५०२ शासकीय आणि ५३९ अनुदानित आश्रमशाळा कार्यरत असून, या शाळांमधून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अनुदानित आश्रमशाळांमध्ये फिरत्या वैद्यकीय पथकांमार्फत नियमित तपासणीची व्यवस्था कागदावर अस्तित्वात असली, तरीही महिनाभरात पाच लाख विद्यार्थ्यांचे स्क्रीनिंग पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म जिल्हानिहाय वेळापत्रक, फिरती वाहने, निदान उपकरणे आणि पुरेसा औषधसाठा सज्ज ठेवावा लागेल. त्यामुळे या अभियानाची खरी फलनिष्पत्ती ‘पाच लाख तपासण्या झाल्या’ या केवळ सांख्यिकी दाव्यात नसून, प्रत्यक्ष बांधावर किती डॉक्टर उतरले, तपासणीला किती वेळ दिला गेला आणि गरजू विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष किती वैद्यकीय उपचार मिळाले, यावरच अवलंबून राहणार आहे. (Tribal Students)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.