Infectious disease: राज्यभरात गणेशोत्सवाची लगबग सुरू असतानाच संसर्गजन्य आजारांनीही डोके वर काढले आहे. सध्या सुरू असलेला ऊन-पावसाचा खेळ, वातावरणात सातत्याने होणारे चढ-उतार, वाढलेली आर्द्रता आणि ठिकठिकाणी साचलेले पाणी यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या संख्येने होते. त्यामुळे डेंग्यु, चिकनगुनिया यासारख्या किटकजन्य आजारांचा धोका वाढला असून, व्हायरल आजारांसह स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्येही वाढ होत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे.
गणेशोत्सव काळात गणपती मंडप, बाजारपेठा, मिरवणुका आणि विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मोठी गर्दी होते. अशा ठिकाणी संसर्गजन्य आजारांचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे सणांचा आनंद घेताना नागरिकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
सार्वजनिक मंडळांच्या गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दीर्घकालिन आजार असलेल्या व्यक्तिंनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
हेही वाचा – Ganeshotsav 2026 : सातासमुद्रापार मराठी संस्कृतीचा डंका! डोंबिवलीच्या मखरात लंडनचा बाप्पा विराजमान
व्हायरलसह स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्येही वाढ
सध्या अनेक रुग्णांमध्ये ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, अशक्तपणा अशी लक्षणे दिसून येत आहेत. काही ठिकाणी स्वाइन फ्लूचे रुग्णही आढळत आहेत. त्यामुळे ताप किंवा श्वसनाशी संबंधित लक्षणे आढळल्यास स्वत:हून औषधं घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी मास्कचा वापर
गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी शक्य असल्यास मस्कचा वापर करावा. गणेश मंडप किंवा सार्वजनिक कार्यक्रमांना गेल्यानंतर हात साबणाने धुवावेत किंवा हात स्वच्छ करण्यासाठी निर्जंतुकीकरण द्रवाचा (सॅनिटायझर) वापर करावा. खोकताना आणि शिंकताना तोंड-नाक झाकावे. आजारी व्यक्तिंपासून सुरक्षित अंतर ठेवावे, असे तज्ज्ञ सांगतात.
‘या’ दोन गोष्टी महत्त्वाच्या…
सर जे.जे. रुग्णालयाचे मेडिसिन विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगिल्यानुसार, सणासुदीच्या काळात गर्दी वाढल्याने विषाणुजन्य संसर्गाचा धोका वाढू शकतो. ताप, सर्दी, खोकला किंवा अंगदुखीची लक्षणे दिसल्यास साधा व्हायरल ताप समजून दुर्लक्ष करू नये.डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करावी. हाताची स्वच्छता आणि मास्क वापरणे या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
घराच्या परिसरात पाणी वाढणार नाही याची काळजी घ्या,..
पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून राहते. यातच डासांची उत्पत्ती होते. घराचा परिसर, झाडांच्या कुंड्या, पाण्याच्या टाक्या, छतावर किंवा इतर वस्तूंमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. डेंग्यू आणि चिकनगुनियापासून बचावासाठी डासांची उत्पत्ती रोखणे हा महत्त्वाचा उपाय आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

