Mecca Drone Attack : मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असताना आता सौदी अरेबियातील इस्लाम धर्मीयांचे पवित्र शहर मक्काही सुरक्षेच्या कारणाने चर्चेत आले आहे. येमेनमधील इराणसमर्थित हुती विद्रोहींकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा दावा सौदी अरेबियाने केला आहे. या पार्श्वभूमीवर मक्का आणि सौदीच्या किनारपट्टीच्या काही भागांत ‘एअर रेड अलर्ट’ जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मक्केच्या दिशेने येणारे ड्रोन हवेतच नष्ट
सौदीच्या हवाई संरक्षण यंत्रणेने मक्केच्या दक्षिणेकडील भागात हुती बंडखोरांचे सशस्त्र ड्रोन रोखून ते हवेतच नष्ट केल्याचा दावा करण्यात आला आहे. हे ड्रोन मक्केच्या प्रतिबंधित हवाई क्षेत्राच्या दिशेने येत असल्याचे सौदीकडून सांगण्यात आले. या घटनेनंतर मक्का, जिद्दा आणि ताईफ परिसरातील सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले. मक्का हे इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र शहर मानले जाते. पैगंबर मुहम्मद यांचे जन्मस्थान असलेल्या या शहरात दरवर्षी हज आणि उमराहसाठी जगभरातून लाखो मुस्लिम भाविक दाखल होतात. त्यामुळे मक्केच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील मानला जातो.
मक्केच्या सुरक्षेला ‘रेड लाईन’चा इशारा
या घटनेनंतर सौदी अरेबियाने हुती बंडखोरांना कठोर इशारा दिला आहे. मक्का आणि तेथील भाविकांची सुरक्षा ही सौदीसाठी ‘रेड लाईन’ असल्याचे सौदी नेतृत्वाखालील युतीकडून सांगण्यात आले. या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे सौदीतील हवाई वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे वृत्त आहे. इस्रायलमधील ‘हायोम’ वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, मदिना येथील प्रिन्स मोहम्मद बिन अब्दुल अजीज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती.
अमेरिकेचा हस्तक्षेप नाकारल्याचा दावा
या संपूर्ण घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या संभाव्य हस्तक्षेपाबाबतही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सौदीच्या हवाई संरक्षण कारवाईत अमेरिकेने थेट हस्तक्षेप केल्याचे नाकारल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मक्का परिसरातील सुरक्षाव्यवस्था आणि सौदीची हवाई संरक्षण यंत्रणा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा विस्तार होत असताना मक्केसारख्या संवेदनशील धार्मिक स्थळाच्या सुरक्षेचा मुद्दा आता अधिक गंभीर बनला आहे.
हेही पाहा-
https://youtu.be/5Ypw-X2LNgY


