
नितेश तिवारी (Nitesh Tiwari) दिग्दर्शित आणि रणबीर कपूर, साई पल्लवी व यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आणखी वाढली आहे. गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) निमित्ताने चित्रपटाचा पहिला मोशन पोस्टर आणि पहिले गाणे ‘जय जय राम’ प्रेक्षकांच्या भेटीला आले. चित्रपटाच्या या पहिल्या संगीत सादरीकरणातून रणबीर कपूर (Ranbir Kapoor) भगवान श्रीराम आणि साई पल्लवी (Sai Pallavi) सीतेच्या भूमिकेत दिसत आहेत. निर्मात्यांनी या माध्यमातून चित्रपटाच्या संगीत प्रवासाची सुरुवात केली आहे.
‘जय जय राम’ या गाण्याला ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांनी संगीत दिले असून डॉ. कुमार विश्वास (Dr. Kumar Vishwas) यांनी गीतलेखन केले आहे. अरिजित सिंह (Arijit Singh) आणि श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) यांनी हे गाणे गायले आहे. भक्तिगीताचा भाव आणि भव्य सिनेमॅटिक मांडणी यांचा संगम या गाण्यात पाहायला मिळतो. श्रीरामाच्या नावाभोवती केंद्रित असलेल्या या गाण्यात श्रद्धा, भक्ती आणि राम-सीतेच्या नात्याची भावनिक बाजू मांडण्यात आली आहे.
गाण्याच्या व्हिडीओमध्ये राम आणि सीतेच्या विवाहाची झलक, रामाने धनुष्य उचलण्याचा प्रसंग, अयोध्येतील राजेशाही वातावरण तसेच वनवासातील प्रसंग दाखवण्यात आले आहेत. याशिवाय लक्ष्मण आणि भरत यांच्या व्यक्तिरेखांचीही झलक मिळते. रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत, तर अभिनेता आदिनाथ कोठारे भरताच्या भूमिकेत दिसत आहे. ‘जय जय राम’मधून यापूर्वी पूर्णपणे समोर न आलेल्या काही व्यक्तिरेखांचाही खुलासा झाला आहे.
(हेही वाचा – Vaibhav Sooryavanshi Brand Value : १५ वर्षांचा वैभव सुर्यवंशी रोज कमावतोय १.५ ते २ कोटी, प्रश्न ब्रँड मागच्या सुरक्षेचा)
या गाण्यात आदिनाथ कोठारे यांचा भरत, नितेश शर्मा यांचा शत्रुघ्न, सुरभी दास यांची श्रुतकीर्ती, सोनिया बलानीची उर्मिला आणि रिया कपूरची मांडवी अशी पात्रे दिसतात. त्यामुळे ‘जय जय राम’ हे केवळ चित्रपटातील पहिले गाणे न राहता ‘रामायण’मधील महत्त्वाच्या व्यक्तिरेखांची पहिली व्यापक झलक देणारे सादरीकरण ठरले आहे.
सियाराम हे गाणं इथे ऐका: https://youtu.be/yWNPxS0sXnE?si=RWAejEBNKHd-vlrU
‘रामायण’ हा नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असून नमित मल्होत्रा या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. भारतीय महाकाव्य ‘रामायण’ची कथा मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सिनेमॅटिक अनुभवातून मांडण्याचा या प्रकल्पाचा प्रयत्न आहे. चित्रपटातील दृश्यांवर आणि VFX वर मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आले आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या सामग्रीनंतर आता ‘जय जय राम’च्या माध्यमातून प्रेक्षकांना चित्रपटातील पात्रे आणि भावविश्वाची आणखी जवळून ओळख झाली आहे.
गणेश चतुर्थीसारख्या शुभदिनी ‘जय जय राम’ प्रदर्शित करण्यामागेही विशेष संदर्भ आहे. निर्मात्यांनी या दिवशी ‘रामायण’च्या संगीत प्रवासाची सुरुवात केली. श्रीरामाच्या भक्तीभावाशी जोडलेल्या या गाण्यामुळे चित्रपटाच्या प्रचाराला धार्मिक आणि सांस्कृतिक संदर्भही मिळाला आहे. दरम्यान, ‘रामायण’चा पहिला भाग २०२६च्या दिवाळीच्या काळात प्रदर्शित होण्याची तयारी आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
