-
प्रतिनिधी
Bomb Threat Mail मुंबईच्या महापौर कार्यालयाला शुक्रवारी सकाळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. १५ ऑगस्टपूर्वी मुंबईतील महापौर कार्यालय, शाळा, मुंबई मेट्रो तसेच शेअर बाजाराला लक्ष्य करण्याची धमकी या ई-मेलमधून देण्यात आल्याचे समोर आले आहे. महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेलवर हा संदेश पाठविण्यात आला आहे. हा ई-मेल ‘Denise Long’ नावाच्या ई-मेल खात्यावरून पाठविण्यात आला असून, त्यात ‘BOMB Blast Mumbai Mayor Office @ 3:11PM’ असे नमूद करण्यात आला आहे. (Bomb Threat Mail)
(हेही वाचा – BCCI Selectors Controversy : अजित आगरकर यांनी घेतलेले ४ निर्णय जे वादग्रस्त ठरले)
ई-मेलमध्ये महापौर कार्यालयात बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबईतील शाळा, शेअर बाजार आणि मेट्रो सेवेलाही लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आला आहे. १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईत होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी होऊ नये, तसेच शाळा आणि मेट्रोतून प्रवास करू नये, अशा आशयाचा मजकूरही ई-मेलमध्ये असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, ई-मेलमध्ये मुंबईतील घाटकोपर, मरोळ नाका, अंधेरी, गुंदवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मेट्रो मार्गाचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या मुंबईला धक्का देण्याच्या उद्देशाने शेअर बाजाराला लक्ष्य करण्याचा उल्लेख आहे. (Bomb Threat Mail)
(हेही वाचा – India vs Sri Lanka Cricket 2026 : श्रीलंकेत सरावादरम्यान शुभमन गिलला दोनदा लागला चेंडू, भारताची चिंता वाढली)
ई-मेलच्या शेवटी ‘Khalistan National Army’ आणि ‘Babbar Khalsa’ या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, केवळ ई-मेलमध्ये या संघटनांची नावे नमूद असल्याने धमकीमागे प्रत्यक्षात त्यांचाच सहभाग आहे, याचा तपास मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने सुरक्षा यंत्रणांकडून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली गेली आहे, ई-मेल कोणी आणि कोणत्या उद्देशाने पाठविला, त्याचा स्रोत काय आहे, तसेच धमकी खरी आहे की केवळ दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, याचा तपास मुंबई पोलीस, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक, सायबर सेल यांच्याकडून करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी मुंबईत बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून रेल्वे स्थानक, मेट्रो स्थानक, शाळा, आणि मुंबई महानगरपालिका कार्यालयाची तपासणी आणि सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आला आहे. (Bomb Threat Mail)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

