- विशेष प्रतिनिधी
लडाखमध्ये (Ladakh) प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभाच्या (Sindhu Mahakumbh) माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता आणि सर्वधर्म समभावाचा संदेश देशभर पोहोचल्याचे प्रतिपादन विविध मान्यवरांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार (Indresh Kumar) आणि बौद्ध धर्मगुरू पाल्गा रिंपोचे यांचा मुंबईत विशेष सन्मान (Honor) करण्यात आला.
महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांच्या पुढाकाराने सचिवालय जिमखाना येथे आयोजित ‘राष्ट्रीय एकात्मिक समरसता सन्मान सोहळ्या’त राज्यपाल जिष्णू देव वर्मा (Jishnu Dev Varma) यांच्या हस्ते दोन्ही मान्यवरांना मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, धर्मगुरू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अण्णा बनसोडे यांनी समाजातील विविध घटकांमध्ये परस्पर विश्वास, संवाद आणि बंधुभाव वाढविणे ही आजची गरज असल्याचे सांगितले. भारतीय संस्कृतीतील ‘विविधतेत एकता’ हा विचार अधिक बळकट करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असून हा सन्मान सोहळा सामाजिक सलोखा वाढविण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
(हेही वाचा – PUNE: पुण्याची चारही धरणे १०० टक्के भरली, तरीही गुरुवारी ‘या’ भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा; महापालिकेचे नागरिकांना आवाहन)
स्वर्गीय अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्याचा उल्लेख करताना बनसोडे यांनी माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू असल्याचा त्यांचा दृष्टिकोन अधोरेखित केला. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय आणि विकास पोहोचविणे हीच खरी समाजसेवा असल्याची त्यांची शिकवण आजही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
सन्मान (Honor) स्वीकारताना इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांनी गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शांतता, समता आणि मानवतेच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. जागतिक स्तरावर संघर्षाचे वातावरण असताना भारताने सर्वधर्म समभाव, बंधुता आणि शांततेचा मार्ग जगासमोर ठेवला असून समाजातील सर्व घटकांनी एकात्मतेसाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी भारत हा विविधतेतून एकतेचा आदर्श जगासमोर ठेवणारा देश असल्याचे सांगितले. हा सन्मान (Honor) केवळ दोन व्यक्तींचा नसून भारतीय संस्कृती, सामाजिक समरसता आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या मूल्यांचा गौरव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लडाख (Ladakh) येथे प्रथमच पार पडलेल्या सिंधू महाकुंभाच्या यशस्वी आयोजनात योगदान दिल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार आणि बौद्ध धर्मगुरू पाल्गा रिंपोचे यांचा मुंबईतील ‘राष्ट्रीय एकात्मिक समरसता सन्मान सोहळ्या’त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या सोहळ्यात राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता आणि सर्वधर्म समभावाचा संदेश अधिक दृढ करण्याचे आवाहन करण्यात आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

