
-
कल्याण : प्रतिनिधी
Kalyan Cyber Fraud : बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी मोबाईलवर बँकेचे ॲप (Bank app) डाऊनलोड करण्याचा प्रयत्न एका ग्राहकाला चांगलाच महागात पडला. बँकेचे ॲप डाऊनलोड होत असतानाच ग्राहकाच्या खात्यातून तब्बल ६ लाख ९७ हजार रूपये नऊ वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे अज्ञात व्यक्तीच्या खात्यात वळते झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी चौकस तपास सुरू केला आहे.
कल्याण पश्चिमेतील बेतुरकरपाडा परिसरात असलेल्या गृहसंकुलात राहणारे अमन मोहन पिसे (२०) यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्यांचे वडील मोहन पिसे यांचे कल्याण येथील बँक ऑफ इंडियामध्ये (Bank of India) खाते आहे. वडिलांच्या खात्यातील सर्व व्यवहार अमन स्वतः करतात. ते एका वकिलाच्या कार्यालयात अपघात विम्याशी संबंधित काम करतात.
(हेही वाचा – Mark Zuckerberg झुकले! मुलांचे लैंगिक शोषण आणि डीपफेक प्रकरणी मागितली जाहीर माफी)
गेल्या आठवड्यात खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी अमन पिसे यांनी बँकेत जाण्याऐवजी मोबाईलवरून बँकेचे ॲप डाऊनलोड करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी प्ले स्टोअरवर जाऊन बँक ऑफ इंडियाचा लोगो असले आणि BOI Mobile असा उल्लेख असलेले ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड केले. ॲप डाउनलोड होताच अवघ्या एका तासाच्या कालावधीत त्यांच्या खात्यातून १ लाख ९५ हजार, ९५ हजार, ५३ हजार, २५ हजार अशा विविध रकमा मिळून एकूण नऊ व्यवहारांद्वारे ६ लाख ९७ हजार रूपये अज्ञात व्यक्तीच्या खात्यात वर्ग झाले. विशेष म्हणजे, ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यांनी स्वतः कोणताही आर्थिक व्यवहार केलेला नव्हता. हा प्रकार लक्षात येताच मोहन पिसे यांनी तातडीने बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून खात्यातील व्यवहार तात्पुरते थांबविण्याची विनंती केली. त्यानंतर बँकेत जाऊन खात्याचे स्टेटमेंट काढले असता नऊ व्यवहारांमधून ६ लाख ९७ हजार रूपये अज्ञात खात्यावर वर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. बनावट बँक ॲपच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त करत अमन पिसे यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
बनावट ॲपपासून सावधान !
बँकेचे अधिकृत ॲप डाऊनलोड करताना नेहमी प्ले स्टोअरवर (Play Store) बँकेचे सत्यापित खाते तपासा. व्हॉट्सॲप, एसएमएस किंवा अनोळखी लिंकद्वारे आलेले ॲप कधीही डाऊनलोड करू नका. ॲप डाऊनलोड केल्यानंतर OTP, पासवर्ड, CVV किंवा कार्डची माहिती कुणालाही सांगू नका. संशयास्पद व्यवहार दिसल्यास तातडीने बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राला कळवून खाते ब्लॉक करा आणि जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
