Crime : फॉरेन्सिक पुराव्यांमुळे सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश

81
Crime : फॉरेन्सिक पुराव्यांमुळे सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश
Crime : फॉरेन्सिक पुराव्यांमुळे सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश

Crime : गुन्हेगारी जगतात फॉरेन्सिक सायन्सचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून, याच शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) घरफोड्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. अरबाजअली मोसिनाली मलिक (वय ३०) असे या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला वांद्रे येथील बँडस्टँड परिसरातून जेरबंद केले. घटनास्थळावरून मिळालेले ठसे पोलीस दस्तऐवजातील नोंदींशी जुळल्यामुळे या गुन्ह्याचा छडा लागला आहे.

कुर्ला येथील विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत HDIL इमारतीत एका फ्लॅटचा दरवाजा तोडून चोरट्यांनी ४ लाख ५५ हजार रुपये किमतीचे रोख आणि दागिने लांबवले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित ताड आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिपाली कुलकर्णी यांनी पुराव्यांचे संकलन करण्याचे आदेश दिले.

पोलिसांनी घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन बोलावून कसून तपास केला. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घरातून बोटांचे ठसे (latent fingerprints) गोळा केले. हे ठसे पोलिसांच्या डेटाबेसमध्ये तपासले असता ते सराईत गुन्हेगार अरबाजअली मलिक याच्याशी जुळले. यानंतर पोलिसांनी सुमारे ४८ तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि खबऱ्यांच्या मदतीने तसेच मोबाईल लोकेशन ट्रेस करत त्याला वांद्रे (Bandra) येथून बेड्या ठोकल्या.

(हेही वाचा – Nashik कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संत, महंत, आखाडा प्रमुखांची होणार बैठक)

पोलिसांच्या चौकशीत मलिकने हा माल एका महिलेला विकल्याची कबुली दिली असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत. तसेच, गुन्ह्यात मिळालेल्या पैशातून त्याने एक मोटारसायकल खरेदी केल्याचा संशय असून ती जप्त करण्यात आली आहे. त्याच्या अटकेमुळे विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यातील आणखी एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे. मलिकवर यापूर्वीही चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

फॉरेन्सिक व्हॅन ठरताहेत वरदान…

मलबार हिल (Malabar Hill) येथे ५५ वर्षीय ज्योती पवार यांच्या खून प्रकरणाचा उलगडाही अशाच शास्त्रीय आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे करण्यात आला होता, ज्यात सीसीटीव्ही किंवा प्रत्यक्षदर्शी नसतानाही फॉरेन्सिक तपासामुळे (Forensic investigation) आरोपी गळाला लागला.

फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मते राज्यातील फिरत्या फॉरेन्सिक व्हॅन्समुळे पोलिसांना घटनास्थळावरच तातडीने मदत मिळत आहे. सध्या मुंबईत अशा १६ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यरत आहेत, तर संपूर्ण महाराष्ट्रात २५९ व्हॅन तैनात करण्यात आल्या आहेत. या शास्त्रीय तपासामुळे साक्षीदारांवरील आणि कबुलीजबाबावरील अवलंबित्व कमी होऊन भक्कम पुरावे गोळा करणे पोलिसांना शक्य होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.