मोदी – शहांवर लक्ष ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या; संजय राऊतांवर BJP चा जोरदार पलटवार

70
BJP
BJP
  • विशेष प्रतिनिधी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपाने (BJP) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी, “मोदी आणि अमित शाह कुठे आहेत, हे विचारण्यापेक्षा महाराष्ट्रातून गायब झालेल्या उबाठा गटाकडे लक्ष द्या,” असा टोला लगावला.

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बन यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कार्यशैलीवरही निशाणा साधला. “मोदी सरकार केवळ सोशल मीडियावरील संवादापुरते मर्यादित नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील जनतेशी सातत्याने प्रत्यक्ष संवाद साधत आहेत. आंध्र प्रदेशातील मोठ्या सभेला त्यांनी संबोधित केले, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहही नुकतेच महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन गेले. मात्र, उद्धव ठाकरे यांचे सरकार मातोश्रीवरून फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून चालत होते. अडीच वर्षांच्या कार्यकाळात ते मोजक्याच वेळा मंत्रालयात गेले,” असा आरोप त्यांनी केला.

अमित शाह यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून संजय राऊत यांच्यावर टीका करताना बन म्हणाले, “कलम ३७० हटवणे, काश्मीरमधील दगडफेक रोखणे, दहशतवाद आणि नक्षलवादाविरोधात कठोर कारवाई करणे, तसेच राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देणे, या निर्णयांमुळेच अमित शाह यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. १४० कोटी भारतीयांचे त्यांना पाठबळ असून विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली म्हणून काहीही फरक पडणार नाही.”

(हेही वाचा – एआय वाईट नाही, पण विचारशून्य होऊ नका, सजग राहण्याचा सल्ला देत Tukaram Mundhe यांचे तरुणांना आवाहन)

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलेल्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिले. “दडपशाही आणि गुंडगिरी म्हणजे काय, हे रोहित पवार यांनी आपल्या आजोबांना विचारावे. शरद पवार मुख्यमंत्री असताना नागपूरमधील गोवारी आंदोलनादरम्यान झालेल्या घटनेची आठवण त्यांनी ठेवावी,” असे बन म्हणाले.

राजकारणातील घराणेशाहीवर टीका करताना त्यांनी, “राज ठाकरे यांना अमित ठाकरे यांचे, तर उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांचे राजकीय भवितव्य घडवायचे आहे. भाजपात मात्र मुलांचे किंवा नातवंडांचे करिअर घडवण्यासाठी राजकारण केले जात नाही. हाच भाजप आणि इतर पक्षांमधील मूलभूत फरक आहे,” असा दावा केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडियावरील संवादावर टीका करणाऱ्यांनाही बन यांनी उत्तर दिले. “तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या पंतप्रधानांच्या उपक्रमामुळे विरोधक अस्वस्थ झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात सरकार गंभीर असून अशा प्रवृत्तींना पाठीशी घातले जाणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.