- कल्याण : प्रतिनिधी
सततच्या पावसामुळे बारवी धरणाच्या (Barvi Dam) पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी ३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता बारवी धरणाची पाणी पातळी ७१.६४ मीटर इतकी नोंदविण्यात आली असून धरण ९०.९९ टक्के भरले आहे. धरणाची उत्सारित पातळी अर्थात ओव्हरफ्लो लेव्हल ७२.६० मीटर इतकी आहे. सध्या पाणलोट क्षेत्रातून धरणात येणाऱ्या पाण्याचा वेध कोणत्याही क्षणी वाढू शकतो.

बारवी धरणाची (Barvi Dam) जलाशय पातळी वाढून धरणाचे स्वयंचलित वक्रद्वार म्हणजेच गेट कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी बारवी धरणातून बारवी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आसनोली, चांदप, चांदपाडा, पिंपळोली, सागांव, पाटीलपाडा, पादरीपाडा, कारंद, मोऱ्याचापाडा, चोण, रहाटोली, आघाणवाडी, फणसवाडी, वाकडीचीवाडी या गावांसह नदी काठावरील इतर शहरे आणि गावांतील प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित भागातील सरकारी यंत्रणा तसेच गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आणि पोलिस पाटील यांनी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याबाबत नागरिकांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात, असे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे.
(हेही वाचा – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत घेणार ‘Gen Z’, ‘Gen Alpha’ यांची भेट, ६ ऑगस्टला भव्य युवा-नेतृत्व परिषद)
तसेच या काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात नागरिकांनी व पर्यटकांनी प्रवेश करू नये. नदीच्या पात्रात पोहण्यास सक्त मनाई करण्यात यावी. या संदर्भातील सूचना स्थानिक पातळीवर तातडीने देण्यात याव्यात असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि जिल्हाधिकारी ठाणे यांच्या ७ मे २०२६ च्या पत्रानुसार बारवी धरणाकरिता स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नियंत्रण कक्षाचा भ्रमणध्वनी क्रमांक ७५०७८३४५०४ असून नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन माहिती किंवा मदतीसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा.
या संदर्भातील माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता उमेश देशमुख (Umesh Deshmukh) यांनी दिली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य अभियंता, ठाण्याचे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता, ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषद, निवासी उपजिल्हाधिकारी, कल्याण (Kalyan) आणि अंबरनाथचे (Ambernath) उपविभागीय अधिकारी, बारवी धरणाचे उपविभागीय उपअभियंता, तसेच स्थानिक पोलिस ठाण्यांसह संबंधित ग्रामपंचायतींना या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.
नियंत्रण कक्षाचा क्रमांक जाहीर
बारवी धरणाची सध्याची पाणी पातळी (Barvi Dam Water Level) ७१.६४ मीटर इतकी आहे. क्षमता ९०.९९ टक्के असून ओव्हरफ्लो पातळी ७२.६० मीटर इतकी आहे. पाण्याचा विसर्ग झाल्यास आसनोली, चांदप, चांदपाडा, पिंपळोली, सागांव, पाटीलपाडा, पादरीपाडा, कारंद, मोऱ्याचापाडा, चोण, रहाटोली, आघाणवाडी, फणसवाडी, वाकडीचीवाडी ही गावे प्रभावित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागरिकांसाठी नियंत्रण कक्ष क्रमांक ७५०७८३४५०४
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

