मंचरमध्ये शांताबाई शेळके यांचं स्मारक उभारणार, Dilip Walse Patil यांची घोषणा

106
मंचरमध्ये शांताबाई शेळके यांचं स्मारक उभारणार, Dilip Walse Patil यांची घोषणा
मंचरमध्ये शांताबाई शेळके यांचं स्मारक उभारणार, Dilip Walse Patil यांची घोषणा

Dilip Walse Patil : ज्येष्ठ कवयित्री आणि गीतकार (स्व) शांताबाई शेळके यांच्या बालपणीच्या आठवणींशी निगडित मंचर येथील ऐतिहासिक वाडा अलीकडील मुसळधार पावसामुळे अंशतः कोसळल्यानंतर, त्या जागेवर शांताबाईंचे भव्य व प्रेरणादायी स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केली.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शांताबाई शेळके यांच्या वास्तव्याशी संबंधित ऐतिहासिक वाड्याचा काही भाग कोसळला. या घटनेबद्दल दुःख व्यक्त करताना वळसे पाटील म्हणाले, “ही केवळ एका जुन्या वास्तूची पडझड नाही, तर मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेशी जोडलेल्या एका महत्त्वपूर्ण स्मृतीला बसलेला धक्का आहे. आंबेगावच्या संस्कारभूमीत शांताबाईंच्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला आकार मिळाला आणि याच भूमीने मराठी साहित्याला अनेक अजरामर कविता व गीतांची अमूल्य देणगी दिली.”

हेही वाचा – Maharashtra Freedom of Religion Act : राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू! बळजबरीने धर्मांतराला आळा बसणार; काय आहेत तरतुदी?

यापूर्वी अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रेक्षकगृहाला शांताबाई शेळके यांचे नाव देण्यात आले आहे. आता मंचर येथील त्यांच्या ऐतिहासिक वास्तूच्या जागेवर उभारण्यात येणारे स्मारक त्यांच्या साहित्यिक कार्याची आणि सामाजिक योगदानाची कायमस्वरूपी साक्ष देणारे ठरेल, असे वळसे पाटील यांनी नमूद केले.

“हे स्मारक केवळ एक वास्तू नसेल, तर मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या एका थोर साहित्यिकाला वाहिलेली कृतज्ञ आदरांजली असेल. शांताबाईंचा शब्दवारसा आणि आंबेगावशी असलेले त्यांचे अतूट नाते भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान राहील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माजी गृहमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना…

“महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान शांताबाई माझ्या प्राध्यापिका होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याची संधी मला लाभली. त्यांचे साधेपण, साहित्यावरील निस्सीम प्रेम आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता आजही स्मरणात आहे. त्यामुळे वाडा कोसळल्याची बातमी समजताच मन हेलावून गेले.”, अशी माहिती माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.