वसईच्या पेल्हार पूर्व येथील गॅलेक्सी रुग्णालयात कथित मेडिक्लेम घोटाळ्याचा प्रकार उघडकीस आला असून, बनावट वैद्यकीय कागदपत्रे, तपासणी अहवाल आणि उपचारांच्या नोंदींच्या आधारे १७ वैद्यकीय विमा दावे मंजूर करून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीची १० लाख २१ हजार ९२० रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Vasai Fake Mediclaim)
दोन डॉक्टरांसह चौघांवर गुन्हा
या प्रकरणी डॉ. इमरान खान, पूजा खान, डॉ. गौरव शर्मा आणि रजनीश होशायर सिंग यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीचे सर्व्हिस मॅनेजर चेतन चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जून २०२६ मध्ये कंपनीकडून विशेष ऑडिट करण्यात आले. या ऑडिटदरम्यान २०२४ ते २०२६ या कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या विमा दाव्यांची पडताळणी करण्यात आली.(Vasai Fake Mediclaim)
तपासात १७ रुग्णांच्या उपचारांशी संबंधित कागदपत्रांमध्ये गंभीर विसंगती आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. बनावट वैद्यकीय नोंदी आणि तपासणी अहवालांच्या आधारे विमा दावे मंजूर करून घेण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, संबंधितांकडून चौकशी सुरू आहे. तसेच कथित गैरव्यवहारामागील संपूर्ण साखळी आणि इतर संभाव्य लाभार्थ्यांचाही तपास केला जात असल्याची माहिती मिळत आहे(Vasai Fake Mediclaim)
Join Our WhatsApp Community


