Jammu-Kashmir: कुलगाममधील दहशतवादी हल्ल्यात छत्तीसगडच्या दुसऱ्या मजुराचाही मृत्यू

94
Jammu-Kashmir: कुलगाममधील दहशतवादी हल्ल्यात छत्तीसगडच्या दुसऱ्या मजुराचाही मृत्यू
Jammu-Kashmir: कुलगाममधील दहशतवादी हल्ल्यात छत्तीसगडच्या दुसऱ्या मजुराचाही मृत्यू

Jammu-Kashmir: जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम येथे शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या दुसऱ्या मजुराचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे या हल्ल्यात ठार झालेल्या मजुरांची संख्या दोनवर पोहोचली आहे. हे दोन्ही मजूर छत्तीसगडचे रहिवासी होते. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर सील केला असून हल्लेखोरांच्या शोधासाठी शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.

वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, पोलीस महासंचालक नलिन प्रभात व वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा करून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे कडक निर्देश दिले आहेत. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कुलगामच्या केल्लम परिसरातील एका विटभट्टीवर हा हल्ला झाला. ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या दहशतवाद्यांनी परप्रांतीय मजुरांना लक्ष्य करून बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात विटभट्टीत काम करणारे दोन मजूर गंभीर जखमी झाले. मृतांची ओळख दीपक रात्रे (24) आणि बोपिंदर (28) अशी पटली आहे. हल्ल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दीपक या मजूराचा मृत्यू झाला होता, तर बोपिंदर या मजूराला आधी जीएमसी अनंतनाग येथे आणि नंतर पुढील उपचारासाठी सौरा येथील एसकेआयएमएस रुग्णालयात हलवण्यात आले होते, जिथे उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेबद्दल छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी शोक व्यक्त केला असून, राज्य सरकारकडून पीडित कुटुंबांना सर्वतोपरी आवश्यक मदत केली जाईल, असे जाहीर केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.