Konkan Railway च्या लेटमार्कची पोलखोल; २०% ते ५२% गाड्याच वेळेवर

Konkan Railway च्या लेटमार्कची पोलखोल; २०% ते ५२% गाड्याच वेळेवर

105
Konkan Railway
Konkan Railway

मुंबई आणि कोकण-गोवा दरम्यान धावणाऱ्या रेल्वे (Konkan Railway) गाड्यांच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाला असून, अनेक प्रमुख गाड्या तब्बल ५ ते ८ तास उशिराने धावत आहेत. एका माहिती अधिकारातून (RTI) ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. डोंबिवली येथील रहिवासी श्रेयस पटवर्धन यांनी दाखल केलेल्या आरटीआय अर्जाला मिळालेल्या उत्तरानुसार, या मार्गावरील गाड्यांचे वेळ पाळण्याचे प्रमाण (Punctuality rate) अवघे २०% ते ५२% दरम्यान राहिले आहे. यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. (Konkan Railway)

हेही वाचा-BEST Bus Strike: ‘बेस्ट’ संपामुळे मुंबईकरांचे हाल, पण मेट्रो मालामाल!

आरटीआयमधील आकडेवारीनुसार, कोकण रेल्वेची अत्यंत लोकप्रिय आणि प्रिमियम मानली जाणारी ‘मडगाव-मुंबई तेजस एक्सप्रेस’ (२२१२०) १ नोव्हेंबर २०२५ ते १८ मे २०२६ या कालावधीत १४२ फेऱ्यांपैकी तब्बल ११३ वेळा उशिराने धावली. या गाडीचे वेळ पाळण्याचे प्रमाण फक्त २०.४२% इतके नीचांकी नोंदवले गेले आहे. तर मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेस (२२११९) ७८ फेऱ्यांमध्ये उशिराने आली असून तिची वेळ पाळण्याची टक्केवारी ४५.०७% आहे. याशिवाय एलटीटी-मडगाव एसी एक्सप्रेस (५२.६३%), मडगाव-एलटीटी एसी एक्सप्रेस (३०.३५%), करमाळी-एलटीटी एसी एक्सप्रेस (२५%) आणि मंगळुरू-सीएसएमटी एक्सप्रेस (३२.४८%) या गाड्यांची कामगिरीही अत्यंत निराशाजनक राहिली आहे. (Konkan Railway)

हेही वाचा- UBT च्या वर्धापन दिनी नेमकं काय घडलं? ‘त्या’ एका कृतीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

केवळ गाड्यांच्या विलंबाचाच नव्हे, तर ट्रेनमधील अपुऱ्या सुविधांचाही फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. तेजस एक्सप्रेस सारख्या महागड्या गाड्यांमध्ये प्रवाशांकडून जादा भाडे वसूल केले जाते, मात्र तरीही सुविधांचा दर्जा प्रचंड घसरला आहे. प्रवाशांच्या तक्रारींनुसार, गाडीतील इन्फोटेनमेंट सिस्टीम (स्क्रीन) बंद असून अनेक ठिकाणी सीटच्या मागे असलेल्या स्क्रीन काढून तिथे साधे प्लायवूडचे पॅनेल लावण्यात आले आहेत. प्रवाशांनी संताप व्यक्त करताना म्हटले आहे की, जादा पैसे मोजूनही जर ७-८ तास उशीर होणार असेल आणि सुविधा मिळणार नसतील, तर रेल्वे प्रशासनाचा हा मनमानी कारभार थांबणार कधी? गाड्या रात्री उशिरा पोहोचत असल्यामुळे प्रवाशांना घरी जाण्यासाठी रिक्षा किंवा टॅक्सी मिळण्यातही मोठ्या अडचणी येत आहेत. (Konkan Railway)

गाड्यांच्या या विलंबावर कोकण रेल्वे (KR) प्रशासनाने आपली बाजू मांडली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा मार्ग एकेरी (सिंगल लाईन) असल्याने आणि पावसाळ्यापूर्वीची सुरक्षा कामे (Pre-monsoon works) सुरू असल्यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. पावसाळ्यात सुरक्षित प्रवासासाठी ही कामे करणे अत्यंत आवश्यक असते. तसेच गेल्या काही वर्षांत या मार्गावरील गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये झालेली वाढ देखील या विलंबाला कारणीभूत ठरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Konkan Railway)

हेही वाचा- ST Smart Card : एसटीच्या विद्यार्थी पाससाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड अनिवार्य

दरम्यान, ‘कोकण विकास समिती’ या प्रवासी संघटनेचे सदस्य अक्षय महापदी यांनी या समस्येवर उपाय सुचवला आहे. त्यांच्या मते, मडगाव एक्सप्रेस, वंदे भारत, जनशताब्दी आणि तेजस एक्सप्रेस या सर्व गाड्या एकापाठोपाठ एक मडगावच्या दिशेने धावत असल्याने गाड्यांची गर्दी (bunching) होते आणि नियंत्रण करणे कठीण होते. त्यामुळे तेजस एक्सप्रेस आधीप्रमाणेच मडगावऐवजी करमाळी स्टेशनपर्यंतच चालवावी, जेणेकरून वेळापत्रक सुधारण्यास मदत होईल, अशी मागणी प्रवासी संघटनेकडून करण्यात येत आहे. (Konkan Railway)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.