बेस्ट (BEST Bus Strike) कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेस्ट कृती समितीकडून संपाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईची दुसरी जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या बस वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. अशातच आता मुंबईतील BEST कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच राहणार आहे. परिणामी आज देखील मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. एरवी मुंबईच्या रस्त्यांवर दररोज सुमारे 2, 766 बस धावणाऱ्या BEST कडून शुक्रवारी दिवसभरात अवघ्या 48 बस चालवण्यात आल्या. तर चालवण्यात आलेल्या 48 गाड्यांपैकी 9 गाड्या BEST च्या मालकीच्या तर 39 गाड्या वेट-लीजवरील होत्या. (BEST Bus Strike)
हेही वाचा-Vidarbha : विदर्भातील ‘सोनं’ जळतंय; संत्र-मोसंबीच्या बागा वाचवण्यासाठी बळीराजाची आर्त हाक
दरम्यान, संपाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी दगडफेक, टायर पंक्चर करणे आणि गाड्यांच्या काचा व आरसे फोडण्याच्या घटनांमुळे 26 गाड्यांचे नुकसान झाले आहे. तर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आंदोलक संघटनांच्या प्रतिनिधींशी बैठक घेतली होती. 12 संघटनांच्या कृती समितीने ही बैठक सकारात्मक झाल्याचे म्हटले असले, तरी ती निष्फळ ठरल्याचा दावा करत रात्री साडेनऊ वाजता संप सुरूच ठेवण्याची घोषणा केली. त्यामुळे BEST बससेवा आजही ठप्पच राहणार असून मुंबईकरांना दुसऱ्या दिवशीही प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार. ठोस निर्णय न झाल्याने अद्याप आंदोलन सुरुच असणार आहे. (BEST Bus Strike)
दुसरीकडे, बेस्टसंपामुळे मुंबईतील सर्वच मेट्रो मार्गांवरील प्रवासी संख्येत शुक्रवारी मोठी वाढ झाली. त्यामुळे मेट्रोच्या उत्पन्नात भर पडली. विविध ठिकाणी मेट्रो स्थानकांवर प्रवाशांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेवरही शुक्रवारी मोठी गर्दी झाली होती. परिणामी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत तब्बल ३८ हजार अतिरिक्त प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला होता. तर रात्री उशिरापर्यंत नेहमीपेक्षा तब्बल ६० हजार अधिक प्रवासी प्रवास करतील, अशी अपेक्षा एमएमओपीएलच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे शुक्रवारी मेट्रो गाड्यांच्या अतिरिक्त १० फेऱ्या चालविण्यात आल्या. अशा प्रकारे फेऱ्यांची संख्या ४७६ वरून ४८६ वर पोहोचली. (BEST Bus Strike)
हेही वाचा- Chembur मध्ये अल्पवयीन मुलांकडून गांजा विक्रीचे रॅकेट चालवणाऱ्या महिलेला अटक
आरे ते कफ परेड भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवर १२ जूनला, शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत १,४४,२९१ प्रवाशांनी प्रवास केला होता. तर १९ जूनला तब्बल १,८१,७१६ प्रवाशांनी प्रवास केला होता. गुरुवारी १८, जूनला सायंकाळी ७ वाजेपर्यंत या मेट्रो मार्गिकेवर १,५१,५०२ प्रवाशांनी प्रवास केला होता. भुयारी मेट्रोच्या सीएसएमटी स्थानकात शुक्रवारी सकाळपासूनच गर्दी होती. एमएमएमओसीएलच्या मेट्रो मार्गिकांवर गुरुवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत २,३४,५९३ प्रवाशांनी प्रवास केला होता. यात वाढ होऊन शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रवाशांची संख्या २,४८,४५३ वर गेली. प्रवासी संख्येत १४ हजारांची वाढ नोंदविली गेली. रात्री ९ वाजेपर्यंतच ही संख्या २ लाख १७ हजार ९२७ वर गेली. मेट्रो सुरू झाल्यापासून आतापर्यंत पहिल्यांदाच ही प्रवासी संख्या २ लाखांपार पोहोचली. दरम्यान, सेवा संपेपर्यंत यात आणखी हजारोंची वाढ होण्याची अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. (BEST Bus Strike)
Join Our WhatsApp Community

