-
विशेष प्रतिनिधी
Monsoon : राज्यात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबामुळे शेतकरी (Farmer) वर्गासमोर चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार (Jay Pawar) यांनी मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राला (RMC) भेट दिली. यावेळी हवामान तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा करून त्यांनी पावसाच्या सद्यस्थितीचा आणि विलंबाच्या कारणांचा सखोल अभ्यास केला.
(हेही वाचा – Dombivli च्या कुख्यात स्वीट ड्रीम बारवर चौथ्यांदा कारवाई; बारबालांसह ३२ जणांवर गुन्हा)
प्रादेशिक हवामान केंद्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात २५ जूनच्या सुमारास पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जय पवार यांनी राज्यातील बळीराजाला एक अत्यंत मोलाचा सल्ला दिला आहे. पाऊस पूर्णपणे सक्रिय होऊन जमिनीत पुरेशी ओल निर्माण होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. घाईत केलेल्या पेरणीमुळे पावसाने पुन्हा ओढ दिल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
जय पवार (Jay Pawar) यांनी हवामान खात्याच्या तज्ज्ञांशी चर्चा करताना एल निनोचा (El Niño) प्रभाव आणि इतर हवामानविषयक घटकांबाबत माहिती जाणून घेतली. शेतकरी बांधवांना पावसाच्या अचूक अंदाजांची माहिती मिळावी आणि त्यांचे नुकसान टाळावे, यासाठी ते स्वतः प्रादेशिक हवामान केंद्राच्या सातत्य संपर्कात राहणार आहेत. समाधानकारक पाऊस होईपर्यंत संयम राखून हवामान खात्याच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे कळकळीचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

