Kalyan स्टेशनसमोर तळीरामांचे खुलेआम मद्यपान; व्हिडिओ व्हायरल, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

76
Kalyan स्टेशनसमोर तळीरामांचे खुलेआम मद्यपान; व्हिडिओ व्हायरल, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Kalyan स्टेशनसमोर तळीरामांचे खुलेआम मद्यपान; व्हिडिओ व्हायरल, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
  • कल्याण : प्रतिनिधी

Kalyan : कल्याण पश्चिमेकडे रेल्वे स्टेशन समोर खुलेआम मद्यपान करणाऱ्या तळीरामांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये रात्री आठ वाजण्याच्या सुमारास स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर काही तळीराम रस्त्यावर मद्यपान करताना दिसत आहेत. व्हिडिओसोबत येथे भय उरलेच नाही…अशी कॅप्शन देण्यात आली असून हा व्हिडिओ काही तासांतच हजारो लोकांपर्यंत पोहोचला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे कल्याणकर प्रवासी, महिला आणि स्थानिक रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे स्टेशनसारख्या अत्यंत गर्दीच्या, सार्वजनिक आणि संवेदनशील ठिकाणी तळीरामांकडून खुलेआम मद्यपान होत असल्याने साऱ्यांच्याच सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः रात्रीच्या सुमारास या परिसरातून जाताना असुरक्षित वाटत असल्याची प्रतिक्रिया अनेक महिलांनी दिली. परिसरात असे दृश्य वारंवार दिसत असल्याच्या तक्रारी कल्याणकारांनी यापूर्वीही केल्या आहेत. (Kalyan)

(हेही वाचा – TET Exam New Rule : बुरखा आणि मास्क घातल्यास ‘नो एन्ट्री’; परीक्षा केंद्रावर जाताना ‘ही’ काळजी घ्या)

तळीरामांना कायद्याचा धाक नाही

तळीरामांमध्ये तरूण मंडळीचा भरणा अधिक प्रमाणात असल्याचे हाती आलेल्या व्हिडिओतून स्पष्ट दिसून येत आहे. कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे हा मुंबई पोलिस (Mumbai Police) कायद्याच्या कलम १० अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे. असे असतानाही स्टेशनसारख्या ठिकाणी बिनधास्तपणे मद्यपान करणे आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल होणे ही बाब चिंताजनक आहे. जागरूक नेटकऱ्यांच्या मते, या प्रकारामुळे कायद्याचा धाक उरला नसल्याचे दिसून येते. तसेच परिसरातील वाहतूक आणि पादचारी मार्गालाही अडथळा निर्माण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. (Kalyan)

उपद्रव नसला तरी विपरीत घडण्याची शक्यता

नोकरी/धंद्याच्या ठिकाणांहून सायंकाळी सुट्टी झाल्यानंतर अनेक तळीराम लोकलने उतरून जवळच्या दारू दुकानातून बाटली आणि पाणी घेऊन त्यांच्या नेहमीच्या अड्ड्यावर जातात. या अड्ड्यावर चाखण्याची व्यवस्था करण्यासाठी एक/दोन ठेलेही लागलेले असतात. या ठेल्यांवरील चणे, फुटाणे, शेंगदाणे, उकडलेली अंडी, आदी चाखणा घेऊन सार्वजनिक ठिकाणी (Public place) मद्यपान करण्यात येते. अशा तळीरामांकडून उपद्रव जरी होत नसला तरीही तेथे कोणत्याही क्षणी काहीही विपरीत घटना घडू शकते, असा अंदाज जागरूक नेटकऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. (Kalyan)

पोलिसांसह दारूबंदी खात्यानेही ॲलर्ट राहण्याची मागणी

तळीरामांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस, वाहतूक नियंत्रण विभाग आणि विशेषतः दारूबंदी खाते अर्थात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे या प्रकाराकडे लक्ष नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागाने व्हिडिओच्या आधारे चौकशी सुरू केली असून व्हिडिओमधील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. एकीकडे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेनंतर कल्याणकरांनी समाज माध्यमांवरही नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे स्टेशनसारख्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल तर सामान्य नागरिकांनी कुठे जायचे ? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी दारूबंदी खाते आणि पोलिस ठोस पावले उचलून परिसरात कायमस्वरूपी गस्त वाढवतील का, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Kalyan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.