Lohagad Tragedy : पुण्याच्या लोहगड परिसरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. लग्नाचा मुहूर्त आणि जागा निश्चीत झाली होती, होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नवरदेव तिला घेऊन लोहगडावर ट्रेकिंगसाठी गेला होता, मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. पुणे जिल्ह्यातील (Pune) लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 24 वर्षीय केतन विशाल अग्रवाल (Ketan agarwal) याचा, 350 फूट खोल दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे अग्रवाल कुटुंबासह संपूर्ण पुणे शहरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल हा पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. होणाऱ्या पत्नीचा 19 जूनला वाढदिवस असल्याने, त्यानिमित्ताने विशेष सेलिब्रेशनचे नियोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी गुरुवारी सकाळी केतन आपल्या होणाऱ्या पत्नीसह, मित्रमंडळी आणि कुटुंबीयांसोबत मावळ तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेला होता.
फोटो काढताना घडला भीषण अपघात
लोहगड किल्ल्यावरील निसर्गरम्य परिसराचा आनंद घेत असताना केतन फोटो आणि व्हिडिओ शूट करत होता. यावेळी तो कड्याच्या अत्यंत जवळ गेला. अचानक तोल गेल्याने त्याचा पाय घसरला आणि तो थेट खोल दरीत कोसळला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तो सुमारे 350 ते 400 फूट खोल दरीत पडला. डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथक आणि पोलिसांनी शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढला.
कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
केतनचा विवाह पुढील महिन्यात अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडणार होता. त्यासाठी राजस्थानातील जयपूर किंवा उदयपूर परिसरातील आलिशान पॅलेस बुक करण्यात आला होता. विवाहसोहळ्यासाठी कोट्यवधी रुपयांची तयारी सुरू होती. देशभरातील मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार होता. पाहुण्यांच्या प्रवासासाठी विशेष विमानांचीही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र लग्नाच्या काही दिवस आधीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्व तयारीवर विरजण पडले आहे.
ज्या घरात काही दिवसांत लग्नाच्या सनई-चौघड्यांचा नाद घुमणार होता, त्या घरात आता शोककळा पसरली आहे. होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आखलेला आनंदाचा दिवस अग्रवाल कुटुंबासाठी आयुष्यभराची वेदना बनला. केतनच्या अकाली निधनामुळे त्याचे मित्र, नातेवाईक आणि व्यावसायिक वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पर्यटनस्थळी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
लोहगड हा पुणे आणि मुंबई परिसरातील सर्वाधिक लोकप्रिय ट्रेकिंग स्थळांपैकी एक आहे. विशेषतः पावसाळ्यात येथे हजारो पर्यटक गर्दी करतात. मात्र कड्यांच्या टोकावर जाऊन फोटो काढण्याच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे अनेक अपघात घडल्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.


