-
प्रतिनिधी
Chandrakant Patil बदलत्या काळातील तीव्र स्पर्धा आणि डिजिटल युगातील आभासी जगामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असतानाच, राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी आणि त्यांना नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या (MSFDA) वतीने ‘मानससूत्र – विद्यार्थी मानसिक आरोग्य व कल्याण’ या विशेष तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे अनावरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात उत्साहात पार पडले. (Chandrakant Patil)
या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, एमएसएफडीएचे कार्यकारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सद्यस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, आजचा विद्यार्थी केवळ पुस्तकी अभ्यासाच्या ओझ्याखाली नाही, तर सामाजिक अपेक्षा आणि भावनिक एकाकीपणाशीही झुंज देत आहे. अशा वेळी शिक्षक केवळ मार्गदर्शक नसून एक संवेदनशील आधारस्तंभ होणे काळाची गरज आहे. (Chandrakant Patil)
(हेही वाचा – West Bengal : बंगाल पेटवणारे रडारवर; २०० हून अधिक गुन्हे दाखल; सीसीटीव्हीच्या आधारे दंगलखोरांची धरपकड सुरू)
‘मानससूत्र’ हा उपक्रम केवळ एक कोरडा प्रशिक्षण वर्ग नसून तो शिक्षकांच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडवणारा एक व्यापक प्रकल्प आहे. यामध्ये विद्यार्थ्यांमधील वाढता मानसिक ताण आणि नैराश्याची प्रारंभिक लक्षणे ओळखण्याचे कसब शिक्षकांना शिकवले जाईल. तसेच, आत्महत्येसारख्या टोकाच्या प्रवृत्तींची चिन्हे ओळखून वेळीच हस्तक्षेप करण्यासाठी अध्यापकांना सक्षम केले जाणार असून महाविद्यालयांमध्ये समुपदेशनाची आणि योग्य संदर्भाची (Referral System) एक भक्कम साखळी निर्माण केली जाईल. (Chandrakant Patil)
राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील वातावरण अधिक आनंददायी आणि सुरक्षित व्हावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ‘मानससूत्र’ मुळे अध्यापक आणि विद्यार्थी यांच्यातील संवादाचा पूल अधिक मजबूत होईल आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याबाबत समाजात मोठी जागरूकता निर्माण होईल, असा ठाम विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. (Chandrakant Patil)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

