
-
प्रतिनिधी
बारावीच्या परीक्षेचा पहिलाच दिवस एका कुटुंबासाठी काळोख घेऊन आला. डोंबिवलीहून कळवा येथे बारावीच्या परीक्षेसाठी निघालेल्या एका १८ वर्षीय विद्यार्थ्याचा चालत्या लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. १०) सकाळी मुंब्रा-कळवा दरम्यान घडली. सोहम कठरे असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात आणि शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. (Dombivli Student Death)
सोहम हा मूळचा सातारा जिल्ह्यातील पाचवड (कठरेवाडी) येथील असून सध्या तो डोंबिवली (पश्चिम), आजदेगाव येथे राहत होता. तो कळवा येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी होता. त्याचे परीक्षा केंद्र कळव्यातील मनिषानगर विद्यालयात आले होते. मंगळवारी इंग्रजी विषयाचा पहिला पेपर असल्याने तो डोंबिवलीहून लोकलमधून कळव्याकडे निघाला होता. (Dombivli Student Death)
(हेही वाचा – Dombivli : माणूसच उठला झाडांच्या मुळावर; हिरव्या सावरीवर कुऱ्हाडीचे घाव)
सकाळच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते. सोहम ज्या लोकलमधून प्रवास करत होता, ती लोकलही प्रवाशांनी गच्च भरलेली होती. दरवाजाजवळ लटकून प्रवास करत असताना खारेगाव फाटकाच्या आधी सोहमचा अचानक तोल गेला आणि तो रेल्वे ट्रॅकवर कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. (Dombivli Student Death)
ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, धावत्या गाडीतून तोल गेल्यानेच हा अपघात झाला असावा. सोहमच्या पश्चात आई-वडील आणि नववीत शिकणारा लहान भाऊ असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर सोहमचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्याच्या मूळ गावी नेण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. (Dombivli Student Death)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
