-
ऋजुता लुकतुके
फॉर्म्युला वन रेसिंगचा माजी सुपरस्टार मायकेल शुमाकरच्या (Michael Schumacher) अपघाताला आता १२ वर्षं झाली आहेत आणि त्याच्या पत्नीने माध्यमांना त्याच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची अपडेट दिली आहे. फ्रान्समधील मेरिबेल येथे स्कीईंग करत असताना झालेल्या अपघातात शुमाकरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातानंतर अनेक महिने तो कृत्रिम कोमामध्ये होता आणि त्याचे आयुष्य कायमचे बदलून गेले.
आज बारा वर्षांनंतरही शुमाकर (Michael Schumacher) स्वित्झर्लंडमधील लेक जिनिव्हा येथील आपल्या घरी अत्यंत निगराणीखाली उपचार घेत आहे. उपलब्ध माहितीनुसार तो बहुतांश वेळ अंथरुणावर असतो, बोलू शकत नाही आणि डोळ्यांच्या हालचालींमधूनच संवाद साधतो. सुमारे १५ वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक चोवीस तास त्याची काळजी घेत आहे. मोजकेच कुटुंबीय आणि अतिशय जवळचे मित्र त्याला भेटू शकतात.
(हेही वाचा – Pariksha Pe Charcha 2026 : यंदा ४ कोटींपेक्षा जास्त नोंदणी करत नवा विक्रम; केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती)
शुमाकरचे (Michael Schumacher) कुटुंब त्याच्या खासगी आयुष्य गोपनीयच राहील याची काळजी घेतं. त्याच्या प्रकृतीविषयी फारच कमी माहिती बाहेर येते. पण, यावेळी त्याची पत्नी कोरिना शुमाकर यांनी मायकेल शुमाकरवर घरीच उपचार सुरू असल्याचं आणि घरातच रुग्णालय सदृश व्यवस्था उभी केल्याचं सांगितलं आहे. माजी फेरारी प्रमुख जीन टॉड यांनी म्हटले होते, “मायकेल आमच्यात आहे, पण तो पूर्वीसारखा राहिलेला नाही.” हे शब्द अपघाताचा त्याच्या आयुष्यावर झालेला खोल परिणाम दर्शवतात.
रेड बुलचे माजी अधिकारी रिचर्ड हॉपकिन्स यांनीही शुमाकरबाबत (Michael Schumacher) बोलताना संवेदनशीलता व्यक्त केली आहे. कुटुंबाच्या गोपनीयतेमुळे आपण त्याच्या स्थितीबद्दल बोलणे टाळतो, असे त्यांनी स्पष्ट केले. काही अहवालांमध्ये तो केवळ डोळ्यांच्या हालचालींमधून संवाद साधतो, असे सांगण्यात आले आहे. कधीकाळी ट्रॅकवर वेग, जिद्द आणि विजयाचे प्रतीक असलेला मायकेल शुमाकर आज शांततेत, कुटुंबाच्या संरक्षणात आपले आयुष्य जगत आहे. नियतीने त्याच्यावर केलेला आघात जगासाठी वेदनादायक असला, तरी त्याच्या कुटुंबाची निष्ठा आणि काळजी ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद ठरली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

