
-
ऋजुता लुकतुके
मागचं वर्षभर चर्चा सुरू असतानाही भारत आणि अमेरिकेदरम्यानचा व्यापारी करार अजून रखडलेलाच आहे आणि त्याविषयी फारशी स्पष्टता मिळत नसल्यामुळे भारतातील शेअर बाजार आणि बाँड बाजारावरही त्याचा परिणाम जाणवत आहे. आता कराराला होत असलेल्या विलंबाचं खापर अमेरिकेनं भारतावर फोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन न केल्यामुळे हा विलंब होत असल्याचं वक्तव्य केलं आहे. अर्थातच, भारताने तातडीने हे विधान खोडून काढलं आहे. (India – US Trade)
अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लटनिक यांनी केलेल्या वक्तव्यावर भारताने शुक्रवारी ठाम शब्दांत आक्षेप नोंदवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन न केल्यामुळे भारत-अमेरिका व्यापार करार होऊ शकला नाही, असा दावा लटनिक यांनी एका पॉडकास्टमध्ये केला होता. मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे वक्तव्य तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले आहे. (India – US Trade)
(हेही वाचा – Pariksha Pe Charcha 2026 : यंदा ४ कोटींपेक्षा जास्त नोंदणी करत नवा विक्रम; केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती)
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले की, भारत आणि अमेरिका १३ फेब्रुवारी २०२४ पासून द्विपक्षीय व्यापार करारासाठी कटिबद्ध आहेत. त्या कालावधीत दोन्ही देशांमध्ये अनेक फेऱ्यांमध्ये चर्चा झाली असून, समतोल आणि परस्पर हिताचा करार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. “अनेक वेळा आपण कराराच्या अगदी जवळ पोहोचलो होतो. मात्र चर्चांचे जे वर्णन करण्यात आले आहे, ते अचूक नाही,” असे जैस्वाल म्हणाले. (India – US Trade)
भारत अजूनही परस्पर फायदेशीर व्यापार करारासाठी इच्छुक असून, दोन्ही अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. तसेच २०२५ या वर्षात पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष ट्रम्प यांच्यात आठ वेळा दूरध्वनीवर संवाद झाला असून, विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली. (India – US Trade)
(हेही वाचा – Greenland मध्ये असे काय आहे ज्यासाठी डोनाल्ड ट्रम्प झालेत कासावीस; जाणून घ्या…)
दरम्यान, लटनिक यांनी भारत करारासाठी “तयार नव्हता” आणि थेट संवाद साधण्यास “अस्वस्थ” होता, असा आरोप केला. ट्रम्प यांची व्यापार धोरणाची पद्धत त्यांनी “पायरी-पायरीने” असल्याचे सांगत, आधी येणाऱ्या देशांना चांगल्या अटी मिळतात, असा दावा केला. उच्च आयात शुल्क, स्थलांतर धोरण आणि भारत-पाकिस्तान संदर्भातील ट्रम्प यांच्या वादग्रस्त दाव्यांमुळे भारत-अमेरिका संबंधांवर तणाव असला, तरी भारताने या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट आणि ठामपणे मांडली आहे. (India – US Trade)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
