आगीमध्ये अडकलेल्या दोन विद्यार्थ्यांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

90

पुण्यात 17 नोव्हेंबरला पहाटे 04:40 वाजता कोथरुड, पौड रोड, आनंदनगर, प्रभा को ऑप सोसायटीमधे आग लागल्याची बातमी अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच कोथरुड अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली.

घटनास्थळी पोहोचताच प्रभा को ऑप सोसायटीत तीन मजली इमारतीत दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याने खिडकीमधून आगीच्या ज्वाळा बाहेर येत असल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी त्या आग लागलेल्या सदनिकेमध्ये दोन जण अडकले असल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यावेळी अग्नीशमक जवानांनी होज पाईप घेऊन वर जाऊन एकीकडे पाण्याचा मारा सुरू केला तर घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर व जवान नितिन घुले यांनी तातडीने ब्रिदिंग अॅपरटस सेट (श्वशन उपकरण) परिधान करुन आत एका खोलीत धुरामध्ये अडकलेल्या एक विद्यार्थी व एक विद्यार्थीनी यांना सुखरुप बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी आणले व त्यांचा जीव वाचवला. जवानांनी जेट स्प्रे वापर करुन पाणी मारत सुमारे दहा मिनिटांत आग विझवली. आग नेमकी कशामुळे लागली समजू शकले नसून विद्यार्थी पहाटेपर्यंत अभ्यास करीत होते असे त्यांनी सांगितले. पुढच्या खोलीमधील लाकडी सामान, सोफा, कपाट, खिडक्या इत्यादी साहित्य जळाले. एका विद्यार्थ्याला किरकोळ स्वरुपात आगीची झळ हाताला लागली आहे.

( हेही वाचा: आज दादर बंद: फेरीवाल्यांना व्यवसाय बंद ठेवण्याच्या पोलीस आणि महापालिकेच्या सूचना )

विद्यार्थ्यांनी मानले आभार 

या कामगिरीत कोथरुड अग्निशमन केंद्र अधिकारी गजानन पाथ्रुडकर, वाहनचालक रमेश गायकवाड व जवान नितिन घुले, संजय महाले, शिवाजी कोंढरे, वैभव आवरगंड यांनी सहभाग घेतला. सदर विद्यार्थ्यांनी अग्निशमन दल वेळेत आल्याने आम्ही सुखरुप बाहेर आलो याबद्दल दलाचे आभार मानले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.