T-20 World Cup Final 2022: इंग्लंडची पाकिस्तानवर मात, बेन स्टोक्स ठरला विजयाचा शिल्पकार

122

T-20 World Cup 2022 मध्ये अंतिम सामन्यात इंग्लंडने बाजी मारली असून, जगज्जेते पदावर आपले नाव कोरले आहे. चुरशीच्या अशा अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने मात करत इंग्लडने टी-20 विश्वचषकाला गवसणी घातली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजनंतर दोन टी-20 विश्वचषक मिळवणारा इंग्लंड हा दुसरा संघ ठरला आहे.

पाकिस्तानची फलंदाजी डगमगली

नाणेफेक जिंकून इंग्लंडने पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पण इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे पाकिस्तानची खेळी डळमळीत झाली. त्यामुळे धावफलकावर पाकिस्तानला केवळ 137 धावांचाच पल्ला गाठता आला. पाकिस्तानने 20 षटकांत 8 बाद 137 धावा केल्या. यामध्ये शान मसूद याने सर्वाधिक 38 धावांची खेळी केली. तर इंग्लंडकडून 4 षटकांत केवळ 12 धावा देऊन सॅम कुरानने 3 गडी टिपले. आदिल रशीद आणि ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर विजयाचा शिल्पकार असलेल्या बेन स्टोक्सने एक गडी बाद केला.

(हेही वाचाः रेल्वे स्टेशनवरील पिचका-या बंद करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची भन्नाट युक्ती)

इंग्लंडचीही दाणादाण

दरम्यान, 138 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी आलेला मैदानात उतरलेल्या इंग्लिश फलंदाजांची सुद्धा पाकिस्तानी गोलंदाजांनी दाणादाण उडवली. भारताविरुद्ध उपांत्य सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करणा-या अलेक्स हेल्सला शाहिन आफ्रिदीने पहिल्याच षटकात बाद केले. त्यानंतर फिलीप सॉल्ट,कर्णधार जॉस बटलर हे देखील पहिल्या पॉवर प्लेमध्ये बाद झाले.

स्टोक्स विजयाचा शिल्पकार

पण त्यानंतर आलेल्या अष्टपैलू बेन स्टोक्सने इंग्लंडला सावरले. स्टोक्सने 49 चेंडूंत 5 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 52 धावा केल्या आणि इंग्लंडला विजयापर्यंत नेले. इंग्लंडने 19 षटकांत 5 बाद 138 धावा करत पाकिस्तानवर मात केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.