राम मंदिर भूमिपूजनावरून पवारांच्या घरातच फूट, पार्थ पवारांचे शुभेच्छा पत्र

94

काही लोकांना मंदिर बांधून कोरोना जाईल असे वाटते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देत राम मंदिर भूमिपूजनाला अप्रत्यक्ष विरोधच दर्शवला होता. मात्र याच मुद्द्यावरून खुद्द शरद पवार यांच्याच घरात मतभेद असल्याचे पहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र आणि शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी पत्र लिहून राम मंदिरावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पार्थ पवार यांचे ‘जय श्री राम

पार्थ पवार यांनी जय श्री राम लिहित पत्राची सुरुवात केली असून, अयोध्येत श्री राम जन्मभूमीचे भुमिपूजन होत आहे. श्रद्धा आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेले श्री राम अखेरीस शांतपणे आपल्या घरी येतील. हा लढा कडवट आणि प्रदीर्घ होता. अखेरीस एक पूर्ण पिढी एका ऐतिहासिक दिवसापशी येऊन ठेपली आहे. त्यामुळे आपण हिंदू श्रद्धेच्या पुनर्स्थापनेचा क्षण अनुभवणार आहोत,” असे मत पार्थ पवार यांनी व्यक्त केले आहे. तसेच आपण राम जन्मभूमी प्रकरणातून एक मोठा धडा शिकला पाहिजे असे आवाहनही पार्थ पवार यांनी नागरिकांना केले आहे. पार्थ पवार यांनी अयोध्येत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा दिल्या आहेत. पार्थ पवार या पत्रात म्हणाले, “काही सत्यांचा आपल्याला विसर पडता कामा नये. या देशाच्या तरुण पिढीने राम जन्मभूमीच्या पवित्र भूमीवरुन सुरु झालेली शाब्दिक लढाई कायदेशीर आणि ऐतिहासिक पाहिली आहे. राम जन्मभूमीच्या या जुन्या प्रकरणावर लोकशाही व्यवस्थेअंतर्गत सामंजस्य आणि शांततामय मार्गाने तोडगा निघाला हेही आपण पाहिलं. यातून आपल्याला एक बोध घेता येईल. या देशाच्या ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांनी काही संस्था उभ्या केल्या. त्या संस्थांवर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि संयमाने वागले पाहिजे. राम जन्मभूमी प्रकरणातून आणखी एक मोठा धडा आपण शिकला पाहिजे. विजयात आपण विनम्र असलं पाहिजे. युक्तिवाद कितीही तर्कहीन, सदोष किंवा दुबळे असले तरीही बाबरी मशिदीविषयी एक भावना होती. जे हरले त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे. त्यांचे तर्क आणि दावे पूर्णपणे पराभूत झाले आहेतच. आता आपण थोडे पुढे गेले पाहिजे. आपला पराभव झाला आहे असं ज्यांना वाटत आहे त्यांना या विजयाच्या क्षणी आपण बरोबर घेतलं पाहिजे,” असं पार्थ पवार यांनी सांगितलं. आजच्या आधुनिक भारतात राम लल्ला यांना अयोध्येत त्यांच्या हक्काचे जे होते ते मिळाले. या क्षणी रामराज्याची आठवण आपल्याला होणे साहजिक आहे. रामराज्य ही संकल्पना बापूंना प्रिय होती. रामराज्यात रामाची पूजा होत असे. कारण रामराज्यात प्रत्येक प्राणिमात्राला, फक्त मनुष्यमात्र नव्हे, सन्मानाने आणि प्रतिष्ठेने वागवलं जात असे,” असंही त्यांनी नमूद केलं.

सुशांत आत्महत्या प्रकरणातही पार्थ पवारांची सीबीआयची मागणी

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास राज्याकडे रहावा अशी मागणी महाविकास आघाडीची असताना पार्थ पवार यांनी मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी योग्य तपास व्हावा अशी संपूर्ण देश, विशेषत: तरूणाईची अपेक्षा आहे. ही भावना लक्षात घेत याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.