बदलीला न घाबरणाऱ्या मुंढेंची ठाकरे सरकारच्या काळात दुसऱ्यांदा बदली

114

मी बदलीला कधीही घाबरत नाही असे म्हणणाऱ्या तसेच त्यांच्या सिंघम स्टाईलने प्रसिद्ध असलेल्या नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची आता पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. मुंढे यांची मुंबई येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात सदस्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. तर नागपूरचे आयुक्त म्हणून राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

तुकाराम मुंढे यांच्यासह राज्यातील अनेक बड्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. आहे. त्यात लोकेश चंद्र यांची नियुक्ती प्रधान सचिव, जलसंपदा विभाग येथे, ए.बी. मिसाळ यांची बदली विभागीय आयुक्त, कोकण विभाग येथे तर अंशु सिन्हा यांची बदली सचिव, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग येथे करण्यात आली आहे. त्याचबरोबर एस.एम देशपांडे यांची नियुक्ती प्रधान सचिव (प्र.सु. व र.व का.) या पदावर केली आहे. दिपा मुधोळ यांची नियुक्ती प्रकल्प व्यवस्थापक, जलस्वराज्य प्रकल्प, नवी मुंबई येथे तर सी. के. डांगे यांची बदली संचालक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा,पुणे येथे करण्यात आली आहे.

मुंढेंची नागपूरचीही कारकीर्द वादग्रस्त

नागपूर महापालिका आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची ठाकरे सरकारने फेब्रुवारी महिन्यात नियुक्ती केली होती. तुकाराम मुंढेंनी कार्यभार हाती घेतल्यापासून अनेकदा त्यांचे आणि महापौर संदीप जोशी यांच्यामधील मतभेद समोर आले होते. पण या दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की, तुकाराम मुंढे यांच्याविरोधात संदीप जोशी यांनी नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच ‘नागपूर महानगर स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे’ सीईओ म्हणून तुकाराम मुंढे यांनी खाजगी कंत्राटदारांना फायदा होईल यासाठी दस्ताएवजांमध्ये फेरफार केली, असा आरोप देखील त्यांनी केला होता.

तुकाराम मुंढेंना कोरोना

दरम्यान नागपूर महानगरपालिकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कोरोनावर मात करण्यासाठी आणि या विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणाऱ्या आणि शासकीय यंत्रणेचा कारभार मोठ्या जबाबदारीने सांभाळणाऱ्या पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द मुंढे यांनीच ट्विट करत याबाबतची माहिती दिली. माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे’, असे म्हणत आपल्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या काळात नियमांप्रमाणे आपण विलगीकरणात राहणार असून, मागील १४ दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच कोरोना चाचणी करण्याचं आवाहन त्यांनी केले.

अशी आहे मुंढेंची कारकीर्द

२००६-०७ – महापालिका आयुक्त, सोलापूर

२००७ – प्रकल्प अधिकारी, धारणी

२००८ – उपजिल्हाधिकारी, नांदेड

२००८ – सीईओ, नागपूर जिल्हा परिषद

२००९ – अति. आदिवासी आयुक्त, नाशिक

२०१० – के. व्ही. आय. सी. मुंबई

२०११ – जिल्हाधिकारी, जालना

२०११-१२ – जिल्हाधिकारी, सोलापूर

२०१२ – विक्रीकर विभाग, सहआयुक्त, मुंबई

२०१६ – महापालिका आयुक्त, नवी मुंबई

२०१७ – पिंपरी-चिंचवड परिवहन, पुणे

२०१८ – महापालिका आयुक्त, नाशिक

२०१८ – नियोजन विभाग, मंत्रालय

२०१८ – महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी

२०२० – नागपूर मनपा आयुक्त

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.