T-20 World Cup: फलंदाजाकडून महिलेवर बलात्कार, संघाने केली हकालपट्टी

136

सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात एक घृणास्पद प्रकार समोर आला. श्रीलंकेचा फलंदाज दनुष्का गुणतीलकाने एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत ऑस्ट्रेलियन पोलिसांनी गुणतीलकाला शनिवारी इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर अटक केली आहे. त्यानंतर आता श्रीलंकन क्रिकेट बोर्डानेही गुणतीलकावर कारवाई केली आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा निर्णय

बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या गुणतीलकाची श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सर्व फॉरमॅटमधून हकालपट्टी केली आहे. श्रीलंका क्रिकेट कार्य समितीने हा निर्णय घेतला आहे. तसेच त्याचा पुढील निवडीसाठीही विचार करण्यात येईल, असे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.

(हेही वाचाः उपांत्य फेरीआधीच ICC ने केला विराटचा गौरव, ‘या’ पुरस्काराने सन्मान)

दरम्यान, याप्रकरणी न्यू साऊथ वेल्सच्या सर्वोच्च न्यायालयात दनुष्का गुणतीलकाच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी सुरू आहे. जर हा जामीन नाकारण्यात आला तर जानेवारी 2023 मध्ये न्यायालयात हजर होईपर्यंत गुणतीलका याला तुरुंगातच रहावे लागू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण?

31 वर्षीय श्रीलंकन फलंदाज दनुष्का गुणतीलकाने ऑस्ट्रेलियातील 29 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका डेटिंग अॅपवर ओळख झाल्यानंतर या दोघांनी एका हॉटेलमध्ये भेटायचे ठरवले. 2 नोव्हेंबर रोजी दनुष्काने संबंधित महिलेला हॉटेल रुममध्ये भेटायला बोलावले. त्यानंतर दनुष्काने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.