- ऋजुता लुकतुके
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) एकदिवसीय विश्वचषक २०२७साठी १२ मैदानांची अधिकृत घोषणा केली आहे. आफ्रिकेत २४ वर्षांनंतर परतणाऱ्या या स्पर्धेचे सामने दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांमध्ये खेळवले जाणार आहेत. त्यापैकी दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) ८ मैदानांवर सर्वाधिक ४४ सामने आयोजित केले जाणार आहेत.
स्पर्धेचे आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२७ या कालावधीत होणार असून, या स्पर्धेत १४ संघ सहभागी होणार आहेत. नव्या स्पर्धा स्वरूपानुसार संघांना दोन गटांमध्ये विभागले जाईल, त्यानंतर सुपर सिक्स टप्पा, उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होईल.
दक्षिण आफ्रिकेतील ज्या आठ मैदानांची निवड करण्यात आली आहे, त्यामध्ये जोहानसबर्ग (वाँडरर्स स्टेडियम), केपटाऊन (न्यूलंड्स), सेंच्युरियन पार्क, डरबन (किंग्समीड), पार्ल (बोलंड पार्क), ब्लूमफॉन्टेन (मंगाउंग ओव्हल), ग्केबेरहा (सेंट जॉर्ज पार्क) आणि ईस्ट लंडन (बफेलो पार्क) या मैदानांचा समावेश आहे.
झिम्बाब्वेमध्ये (Zimbabwe) हरारे स्पोर्ट्स क्लब आणि क्वीन्स स्पोर्ट्स क्लब (बुलावायो) या दोन मैदानांवर सामने खेळवले जातील. नामिबियामध्ये (Namibia) विंडहोक येथील नामिबिया क्रिकेट ग्राउंड आणि वाँडरर्स क्रिकेट ग्राउंड यांची निवड करण्यात आली आहे. नामिबियामध्ये पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषकाचे सामने होणार आहेत.
क्रिकेट साऊथ आफ्रिकाने यापूर्वी आठ संभाव्य मैदानांची यादी जाहीर केली होती. आता आयसीसीने अंतिम यजमान शहरांना मंजुरी दिली आहे. आफ्रिकेच्या ‘उबुंटू’ (Ubuntu) या तत्त्वज्ञानावर आधारित या स्पर्धेद्वारे खंडातील एकात्मता आणि आतिथ्य जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
२००३नंतर प्रथमच आफ्रिकेत वनडे विश्वचषक परतत असून, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे पुन्हा एकदा संयुक्त यजमान म्हणून स्पर्धेचे आयोजन करणार आहेत. नामिबियाचा हा पहिलाच विश्वचषक यजमानपदाचा अनुभव असेल.
विश्वचषक २०२७मध्ये एकूण ५४ सामने खेळवले जाणार असून, स्पर्धेच्या वेळापत्रकाची सविस्तर घोषणा पुढील काही महिन्यांत करण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठीही ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे, कारण दक्षिण आफ्रिकेतील पारंपरिक मैदानांवर पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे. (ODI World Cup 2027)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

