-
ऋजुता लुकतुके
Ind A vs SL A, Tri Series : भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यात दांबुला येथे झालेला तिरंगी मालिकेतील सामना क्रिकेट चाहत्यांसाठी रोमांचक ठरला. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला आणि दोन्ही संघांनी २६५ धावा केल्याने निकाल टाय लागला. मात्र त्यानंतर सुपर ओव्हर (Super Over) खेळवायची की नाही, यावर काही काळ गोंधळ निर्माण झाला आणि त्यामुळे नाट्य अधिकच वाढले.
भारत अ संघाने प्रथम फलंदाजी करत २६५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंका अ संघाने ५० षटकांत ९ बाद २६५ धावा केल्या आणि सामना बरोबरीत सुटला. मर्यादित षटकांच्या स्पर्धेच्या नियमांनुसार अशा परिस्थितीत विजेता निश्चित करण्यासाठी सुपर ओव्हर खेळवली जाते. त्यामुळे सामना टाय झाल्यानंतर पंचांनी सुपर ओव्हरचा निर्णय घेतला.
(हेही वाचा – Solapur Administration : आषाढी वारीचा परिणाम मतदार यादी पुनरिक्षणावर; प्रशासनाची मुदतवाढीची मागणी)
BIG DRAMA AT DAMBULLA 🥶 pic.twitter.com/sOJzXUCXv5
— Danish (@BhttDNSH100) June 15, 2026
मात्र सामना संपत आला तेव्हा प्रकाश कमी होत होता. त्यामुळे सुपर ओव्हर खेळवली जाणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला. भारत अ संघाचा कर्णधार तिलक वर्मा (Tilak Varma) पंचांशी चर्चा करताना दिसला. काही काळ दोन्ही संघ आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती. अखेर नियमानुसार सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका अ संघाने १६ धावा केल्या. या षटकादरम्यान नो-बॉलच्या निर्णयावरूनही वाद निर्माण झाला. त्यानंतर भारत अ संघासमोर १७ धावांचे लक्ष्य होते. वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) आणि सूर्यांश शेडगे (Suryansh Shedge) ही जोडी मैदानात उतरली, मात्र भारत अ संघाला केवळ ९ धावाच करता आल्या आणि श्रीलंका अ संघाने सुपर ओव्हरमध्ये ७ धावांनी विजय मिळवला.
सामना संपल्यानंतरही नाट्य थांबले नाही. श्रीलंका अच्या खेळाडूंच्या जल्लोषादरम्यान वैभव सूर्यवंशी आणि काही श्रीलंकन खेळाडूंमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यामुळे हा सामना केवळ टाय आणि सुपर ओव्हरमुळेच नव्हे, तर मैदानावरील वादामुळेही चर्चेत राहिला.
या मालिकेतील भारतीय ए संघाचा हा दुसरा पराभव आहे. आधीच अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे मालिकेतील वाटचाल भारतासाठी अवघड असणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

