ICC ODI World Cup : अक्षर पटेलच्या जागी रवीचंद्रन अश्विनचा संघात समावेश

ICC ODI World Cup : भारताच्या विश्वचषक संघात अपेक्षेप्रमाणेच एक बदल झाला आहे. जखमी अक्षर पटेलच्या जागी रवीचंद्रन अश्विनची निवड झाली आहे.

79

भारताच्या एकदिवसीय विश्वचषक संघात गुरुवारी ३७ वर्षीय रवीचंद्रन अश्विनचा समावेश करण्यात आला आहे. अक्षर पटेलच्या मांडीचा स्नायू दुखावला आहे. आणि तंदुरुस्तीत पुरेशी सुधारणा झाली नसल्यामुळे अश्विनची संघातली निवड जाहीर करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात राजकोटला अक्षर पटेल खेळला नाही तेव्हाच या बदलाची कल्पना सगळ्यांना आली होती. या मालिकेतील दोन सामन्यांत अश्विनच अक्षरच्या जागी खेळला होता. आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अश्विनने ३ बळी टिपत आपली चुणूक दाखवून दिली होती.

अक्षरच्या दुखापतीमुळे अश्विनला अचानक संघ निवडीचा लाभ झाला आहे. कारण, मागच्या दीड वर्षात तो फक्त दोन एकदिवसीय सामने खेळला आहे. एरवी तो एकदिवसीय संघासाठीच्या रणनीतीचा भाग नव्हताच. पण, आधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याला संधी मिळाली. आणि तिथे किफायतशीर कामगिरी करून त्याने आपली संघातील दावेदारी पक्की केली. ऑस्ट्रेलिया विरुदध मोहालीत अश्विनने एक गडी बाद केला. तर दुसऱ्या इंदूर एकदिवसीय कसोटीत त्याने ४ बळी टिपले.

‘अक्षर पटेलला आशिया चषका दरम्यान बांगलादेश विरुदधच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला. त्यानंतर आशिया चषकाच्या अंतिम सामन्यातही तो खेळू शकला नव्हता. त्यानंतर या दुखापतीतून तो वेळेवर सावरला नसल्यामुळे भारताने आपल्या १५ जणांच्या संघात एक बदल केला आहे,’ असं आयसीसीने आपल्या मीडिया पत्रकात म्हटलं आहे.

(हेही वाचा ICC ODI World Cup : बाबर आझमने भारतीय स्वागताबद्दल काय म्हटलं?)

तसंही अक्षरच्या दुखापतीचा अंदाज निवड समितीला असल्यामुळे विश्वचषकातील त्याची निवड ही प्रोव्हिजनल म्हणजे तंदुरुस्तीच्या अटींना धरून होती.

भारताचा विश्वचषकातील ICC ODI World Cup पहिला सराव सामना ३० सप्टेंबरला इंग्लंड विरुद्ध गुवाहाटी इथं होणार आहे. आणि या सामन्यासाठी रवीचंद्रन अश्विन भारतीय संघाबरोबर असेल.

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड संघाबद्दल आश्वस्त 

अक्षर पटेल हा अष्टपैलू फिरकी गोलंदाज आहे. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातही दुखापत झाल्यानंतर त्याने ४२ धावांची खेळी साकारली होती. शिवाय तो सध्याचा देशातील सर्वोत्तम आणि अचूक ऑफस्पिन गोलंदाज आहे. त्याची दुखापत ही संघासाठी धक्काच आहे. पण, त्याचा फारसा विचार संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड सध्या करत नाहीएत.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी संघाच्या जडणघडणीबद्दल विश्वास व्यक्त केला. अक्षरची जागा अनुभवी अश्विन घेत असल्यामुळे ते निश्चिंत आहेत. फलंदाजी चिंता त्यांना वाटत होती, ती ही मिटलीय असं त्यांच्या बोलण्यावरून वाटत होतं,

‘श्रेयस अय्यर, के एल राहुल आणि जसप्रीत बुमरा महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी तंदुरुस्त झाले हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. फलंदाजी त्यामुळे परिपूर्ण झाली आहे. आणि सगळ्यांना मुख्य स्पर्धेपूर्वी सरावाची चांगली संधी मिळाली आणि आवश्यक विश्रांतीही मिळाली. आता संघ एकजीव झाला आहे,’ या शब्दात त्यांनी आपला विश्वास व्यक्त केला.

श्रेयस आणि राहुलला पुरेशी फलंदाजी मिळाली आणि जसप्रीत पूर्ण दहा षटकं टाकू शकला ही सगळ्यात समाधानाची बाब असल्याचं राहुल यांना वाटतं. के एल राहुल यष्टीरक्षणासाठी पहिला पर्याय असेल, असंही द्रविड यांनी स्पष्ट केलं आहे. भारतीय संघाचा विश्वचषकातील पहिला सामना ८ ऑक्टोबरला चेन्नईत ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे.

एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघ – रोहीत शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, ईशान किशन, सुर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमरा, महम्मद सिराज, शार्दूल ठाकूर व महम्मद शामी.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.