ICC ODI World Cup : बाबर आझमने भारतीय स्वागताबद्दल काय म्हटलं?

ICC ODI World Cup : पाकिस्तान संघाने आधी भारतात क्रिकेट खेळणारच नाही, असा पवित्रा घेतला. त्यानंतर भारत व्हिसा द्यायला दिरंगाई करत असल्याची तक्रार केली. इतकं झाल्यानंतर पाक संघ हैद्राबादमध्ये पोहोचला तेव्हा खेळाडूंचा मूड कसा होता?

97

पाकिस्तानचा क्रिकेट संघ अखेर मंगळवारी भारतात पोहोचला. सुरुवातीला भारतीय संघाने व्हिसा देण्यासाठी दिरंगाई केल्यामुळे खेळाडूंना उशीर होत असल्याची तक्रार पाक प्रशासनाने केली होती. पण, सगळे रुसवे फुगवे झाल्यानंतर कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाक संघ  हैद्राबादमध्ये पोहोचला तेव्हा खेळाडू उत्साहात होते. विमानतळावर त्यांचं स्वागतही जंगी झालं.

चाहत्यांचं खास लक्ष कर्णधार बाबर आझम आणि संघातील मुख्य तेज गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांच्यावर होता आणि दोघांनीही फोटोसाठी उभं राहून चाहत्यांना खूश केलं.

पाकिस्तानी संघ यापूर्वी २०१२-१३ मध्ये शेवटचा मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. पण, त्याला आता दहा वर्षं लोटली आहेत. आणि या कालावधीत पाक संघ पूर्णपणे बदललाय. त्यामुळे नवीन दमाच्या अनेक पाकिस्तानी खेळाडूंसाठी हा पहिलाच भारत दौरा आहे.

त्यामुळे इथल्या वातावरणाशी जुळवून घेणं हे त्यांच्यासमोरचं पहिलं आव्हान असणार आहे. संघाचा पहिला सराव सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. सध्या मात्र पाकिस्तानी हरित पलटन भारतीय आदरातिथ्याने खुश झालेली दिसतेय. पाक कर्णधार बाबर आझमने इन्स्टाग्रामवर तशी स्टोरीही टाकली आहे.

या इन्स्टाग्राम स्टोरीत बाबर लिहितो, ‘हैद्राबादमध्ये मिळालेलं प्रेम आणि आदरातिथ्य यामुळे भारावून गेलो आहे.’ भारतात आल्यावर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत भारतात खेळण्याबद्दलची उत्सुकता बाबर आझम लपवू शकला नाही. ‘आम्ही भारतात यापूर्वी कधी आलेलो किंवा खेळलेलो नाही. पण, विश्वचषकासारख्या (ICC ODI World Cup) सर्वोच्च स्पर्धेत खेळतोय याचा आनंद आणि अभिमान सगळ्यांनाच आहे. स्वत; मला संघाचा कर्णधार असल्याचा अभिमान आहे. आणि इथल्या खेळपट्टीविषयी फारशी चिंता आम्ही करत नाही. आमचा अभ्यास आम्ही केलाय. इतर दक्षिण आशियाई देशांप्रमाणेच इथली खेळपट्टी असेल, असा आमचा अंदाज आहे,’ असं बाबर म्हणाला.

भारतात खेळण्याविषयी तो म्हणतो, ‘घरच्या चाहत्यांचा पाठिंबा आम्हाला नसेल. कारण, ते भारतात प्रवास करू शकणार नाहीत. पण, आमच्या सगळ्या सामन्यांची तिकिटं विकली गेली आहेत. त्यामुळे पूर्ण भरलेल्या मैदानात खेळण्याचा अनुभव आम्हाला मिळेल. आणि त्यासाठी आम्ही वाट बघतोय.’ येत्या २९ तारखेला (शुक्रवारी) पाकिस्तानचा सराव सामना हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडिअमवर न्यूझीलंडशी होईल. पण, या सामन्यासाठी प्रेक्षकांना स्टेडिअममध्ये प्रवेश नसेल. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.