Angelo Mathews Timed Out : अँजेलो मॅथ्यूज टाईम्ड आऊट होणारा जगातील पहिला फलंदाज; टाईम्ड आऊट म्हणजे काय?

117
  • ऋजुता लुकतुके

बांगलादेश आणि श्रीलंके दरम्यानच्या सामन्यात सोमवारी एक वादग्रस्त प्रकार घडला. आणि विचित्र पद्धतीने एक फलंदाज बाद झाला. श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews Timed Out) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम्ड आऊट झालेला पहिला फलंदाज ठरला. म्हणजे झालं असं की, मॅथ्यूज फलंदाजीसाठी वेळेवर मैदानात न उतरल्यामुळे त्याला टाईम्ड आऊट देण्यात आलं.

झालं असं की, सदिरा समरविक्रमा बाद झाल्यावर मॅथ्यूज फलंदाजीसाठी येणार होता. तो ड्रेसिंग रुमच्या बाहेरही आला. पण, इतक्यात त्याच्या हेलमेटचा स्ट्रॅप तुटल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याने संघ सहकाऱ्याला नवीन हेलमेट आणण्यासाठी सांगितलं.

पण, यात वेळ गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक फलंदाज बाद झाल्यावर किंवा निवृत्त झाल्यावर दुसरा फलंदाज येऊन पहिला चेंडू खेळेपर्यंत तुम्हाला तीन मिनिटांचा वेळ मिळतो. विश्वचषक स्पर्धेसाठीच्या नियमावलीत तर दोनच मिनिटं फलंदाजांना देण्यात आली आहेत.

हा नियम माहीत असल्यामुळे बांगलादेशी कर्णधार शकीब अल हसनने पंचांकडे अपील केलं. आणि त्यामुळे नियमावर बोट ठेवून पंचांना मॅथ्यूजला बाद द्यावं लागलं. अशा पद्धतीने अँजलो मॅथ्यूज (Angelo Mathews Timed Out) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम्ड आऊट होणारा पहिला फलंदाज ठरला. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत असे सात बळी झाले आहेत. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाही कर्णधाराने आतापर्यंत असं अपीलही केलं नव्हतं.

(हेही वाचा Virat Kohli : विराटचा वाढदिवस ड्रेसिंग रुममध्ये ‘असा’ झाला साजरा)

त्यामुळे शकीब अल हसनने अशाप्रकारे अपील करणं हे अनेकांना रुचलेलं नाही. त्याने खिलाडी वृत्ती दाखवायला हवी होती, अशी प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटूंनी दिली आहे.

टाईम्ड आऊट नियम नेमका काय आहे?

क्रिकेटच्या नियमावलीत ४० वं कलम हे फलंदाजाने मैदानात उतरण्यासाठी किती वेळ घ्यावा यावर भाष्य करतं. आणि त्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

४०.१.१ या कलमानुसार, एखादा फलंदाज बाद झाला किंवा निवृत्त झाला तर नवीन येणारा फलंदाज पुढील चेंडू खेळेपर्यंत किंवा दुसरा फलंदाज चेंडू खेळेपर्यंत मध्ये तीन मिनिटांचा वेळ देण्यात यावा. हा वेळ आधीचा फलंदाज बाद झाल्यापासून सुरू व्हावा. ही वेळ पाळली गेली नाही तर नवीन फलंदाज बाद देण्यात यावा. हा फलंदाज टाईम्ड आऊट होईल.

४०.१.२ नुसार, नवीन फलंदाज वेळेवर मैदानात उतरला नाही तर अशावेळी पंचांनी नियम १६.३ चा आधार घ्यावा. यात फलंदाज उशिरा आला तर पंच निर्णय जाहीर करू शकतात. हा बळी कुठल्याही गोलंदाजाला मिळत नाही, जसा धावचीतचाही मिळत नाही.

अँजलो मॅथ्यूजला (Angelo Mathews Timed Out) अशा पद्धतीने बाद दिलं गेल्यावर अँजलो मॅथ्यूज चांगलाच वैतागला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.