Dr. Jyotsna Sanjay Kulkarni : दुर्बिणीद्वारे पित्ताशय काढणारी जगातील पहिली महिला लॅपरॉस्कोपिक सर्जन डॉ. ज्योत्स्ना संजय कुलकर्णी!

380
भारताला ललामभूत असलेली दुर्बिणीद्वारे पित्ताशय काढणारी जगातील पहिली महिला लॅपरॉस्कोपिक सर्जन डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी.
  • राधिका कुलकर्णी

उदात्त भावनेने डॉक्टरी व्यवसाय करणारी, रुग्णांना नवजीवन देणारी डॉक्टरव्यक्ती ही पृथ्वीवरील देवदूतच म्हटली जाते. दुर्बिणीद्वारे पित्ताशय काढणारी जगातील पहिली महिला लॅपरॉस्कोपिक सर्जन डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी (Dr. Jyotsna Sanjay Kulkarni) या त्यापैकीच एक! १६ डिसेंबर १९५४ ला जन्मलेल्या डॉ. ज्योत्स्ना या जगप्रसिद्ध युरॉलॉजिस्ट डॉ.संजय कुलकर्णी यांची सहचारिणी आणि कमल व नीळकंठ साठे या दाम्पत्याची कन्या!

अध्ययन – अध्यापन व मानसन्मान

मुंबईत M.S. आणि ग्लासगो (इंग्लंड) इथून FRCS  झालेल्या डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी (Dr. Jyotsna Sanjay Kulkarni)  यांनी १९९० साली महिला डॉक्टर म्हणून जगात प्रथम लॅपरॉस्कॉपिक पद्धतीने पित्ताशय (गॉल ब्लॅडर) काढण्याची शस्त्रक्रिया केली. १९९२ साली त्यांनी भारतातली पहिली अॅनिमल लॅब सुरु केली आणि पुढच्या १० वर्षात ५००हून अधिक सर्जन्सना लॅपरॉस्कॉपीचे शिक्षण देऊन तयार केले. डॉ. ज्योत्स्ना यांना भारतातील लॅपरॉस्कॉपिक शस्त्रक्रियेमध्ये उत्कृष्ट अग्रगण्य कार्य केल्याबद्दल मुंबई मेडिकल फौन्डेशनचे ‘सुश्रुत अॅवॉर्ड’(Outstanding pioneering work in Laparoscopic Surgery in India) मिळाले आहे. तसेच सन २०१८ मध्ये  Maharashtra Association of Surgeons of India Conference – MASICON चे डॉ. जी. एम. फडके ओरेशन मिळाले आहे. ‘मॅसिकॉन’च्या व्यासपीठावर बोलण्यासाठी आमंत्रण मिळणे हे वैद्यकीय व्यवसायात अतिशय प्रतिष्ठेचे मानले जाते. त्याच वर्षी MIT World Peace University & MAEER’s MIMER MEDICAL COLLEGE, PUNE यांचा समर्पित जीवनगौरव पुरस्कार(Dedicated Lifetime Achievement Award) आणि सन २०२१ मध्ये असोसिएशन ऑफ मिनिमल अॅक्सेस सर्जन्स ऑफ इंडिया म्हणजेच ‘अमासी’च्या १६ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘Great Contributor in Laparoscopy’ Award मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर असंख्य परिषदा आणि कार्यशाळांमध्ये त्यांचा सहभाग आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये विविध पदेही डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी भूषविली आहेत. या बरोबरच जगातील इतर असंख्य मानसन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : महागाई, बेरोजगारी हे कळीचे मुद्दे ?; काय सांगतो सर्व्हे…)

उदात्त कार्य १ जानेवारी १९९५ रोजी डॉ. ज्योत्स्ना (Dr. Jyotsna Sanjay Kulkarni) व डॉ. संजय कुलकर्णी या दाम्पत्याने ‘कुलकर्णी एन्डोसर्जरी इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. डॉ. संजय व डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी सन २००० साली महाराष्ट्रातली लॅपरोस्कोपिक डोनर नेफ्रॉक्टॉमी प्रथम पुण्यात केली होती. सन २००६ मध्ये डॉ. संजय यांनी ‘कुलकर्णी स्कूल ऑफ युरेथ्रल सर्जरी’ची स्थापना केली. रीकन्स्ट्रक्टिव्ह युरेथ्रल सर्जरीचे सखोल प्रशिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांना हे हॉस्पिटल स्थापन झाल्यापासून कायम मोफत प्रशिक्षण देत आले आहे.  इथे दर महिन्याच्या एका वीकएन्डला ऑपरेटिव्ह वर्कशॉप घेतले जाते. आपल्या भारतातील आणि परदेशातील सुमारे ८-१० युरॉलॉजिस्ट्स ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित राहतात आणि डॉ. संजय करत असलेली शस्त्रक्रिया प्रत्यक्ष पाहतात. तसेच, या हॉस्पिटलतर्फे रीकन्स्ट्रक्टिव्ह युरॉलॉजीचं ज्ञान संपादन करण्यासाठी दरवर्षी २ भारतीय आणि २ परदेशी अशा ४ युरॉलॉजिस्ट्सना ‘महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस’शी संलग्न असलेली १ वर्षाची फेलोशिप दिली जाते. आजपर्यंत जगातल्या ५२ देशांनी डॉ. संजय आणि डॉ. ज्योत्स्ना यांना या ऑपरेशनचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी बोलावले आहे आणि अजूनही विविध कार्यशाळा, परिषदांमधूनही हे ज्ञानदान व ज्ञानप्रसार अखंड चालूच आहे.

डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी (Dr. Jyotsna Sanjay Kulkarni) व डॉ. संजय कुलकर्णी या दाम्पत्याने १ जानेवारी २०२३ रोजी ‘युरोकुल’ हे युरोनेफ्रॉलॉजीचे सिंगल स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा रुग्णांना व्हावा म्हणून डी.पी. म्हैसकर फौंडेशनने दिलेल्या देणगीतून त्यांच्याच नावाने १५ सप्टेंबर २०२३ रोजी ‘रोबोटिक युरॉलॉजी सेंटर’ही सुरू केले. डिसेंबर २०२३ मध्ये शस्त्रक्रियेविना प्रोस्टेट ग्रंथींवर उपचार करणाऱ्या ‘रिझूम थेरपी’ या यंत्र-तंत्रज्ञानाचा वापर भारतात प्रथम याच हॉस्पिटलमध्ये सुरू झाला. तरुण रुग्णांना याचा सर्वाधिक फायदा होईल. याच वर्षाच्या सुरुवातीला १५ जानेवारी २०२४ रोजी या हॉस्पिटलमध्ये पहिली किडनी ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रियाही यशस्वी झाली. एखाद्या रुग्णाकडे पैसे नाहीत म्हणून त्याच्यावर इलाज करायला डॉ. संजय व डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णींच्या हॉस्पिटलमध्ये कधीही नकार मिळत नाही. रुग्ण कितीही गरीब असो, त्याच्यावरही जगातील सर्वोत्तम उपचारच केले जातात. वैद्यकीय व्यवसाय उदात्त भावनेने करणारे आणि तरुण सर्जन्सची पिढी घडवणारे असे हे जगप्रसिद्ध दाम्पत्य युरोसर्जन डॉ. संजय कुलकर्णी व लॅपरॉस्कॉपिक सर्जन डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी!

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.