Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दीच्या निमित्ताने पुण्यात ढोल-ताशांच्या गजरात निघाली यात्रा; शेकडो राष्ट्रभक्तांचा सहभाग

Veer Savarkar : ६ जानेवारी २०२४ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुरुंगातून सुटका झाली होती, त्या घटनेला १०० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने पुण्यातील येरवडा कारागृह ते फर्ग्युसन महाविद्यालय अशी स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रा काढण्यात आली.

251
Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दीच्या निमित्ताने पुण्यात ढोल-ताशांच्या गजरात निघाली यात्रा; शेकडो राष्ट्रभक्तांचा सहभाग
Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दीच्या निमित्ताने पुण्यात ढोल-ताशांच्या गजरात निघाली यात्रा; शेकडो राष्ट्रभक्तांचा सहभाग

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सशस्त्र क्रांतिकारकांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. लाखो क्रांतिकारकांनी प्राणांचे बलिदान दिल्यामुळे भारताने स्वातंत्र्य मिळवले. या सशस्त्र क्रांतिकारकांचे अग्रणी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. (Veer Savarkar) १९२१ मध्ये अंदमानातून मुक्तता झाल्यावर सावरकरांना रत्नागिरी आणि त्यानंतर येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. नागरिकांच्या वाढत्या दबावामुळे ६ जानेवारी १९२४ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांची कारावासातून मुक्तता झाली. येरवडा कारागृहातून मुंबईला आणून ८ जानेवारी १९२४ ला सावरकरांना रत्नागिरीला नेण्यात येऊन स्थानबद्ध करण्यात आलं आणि प्रारंभ झाला त्यांच्या १३ वर्षांच्या ‘समाजक्रांती पर्वा’चा. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक मुंबई’ यांच्या वतीने ६ जानेवारी रोजी पुण्यातील येरवडा कारागृह ते फर्ग्युसन महाविद्यालय अशी स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रा काढण्यात आली.

(हेही वाचा – Veer Savarkar : स्वा. सावरकर यांच्या समाजक्रांतीकारी कार्याला उजाळा देणारी स्वा. सावरकर कारावास मुक्ती शताब्दी )

ढोल ताशांच्या गजरात निघाली यात्रा

६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता येरवडा कारागृहातून (Yerwada Jail) यात्रेला सुरुवात करण्यात आली. कारागृह अधीक्षकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांच्याकडे सोपवली. तिथून पुढे अभिनेते रणदीप हुडा (Randeep Hooda) ती प्रतिमा घेऊन कारागृहातून बाहेर आले. यानंतर शंखनादाने आणि ढोल-ताशांच्या गजरात घोषणा देत यात्रा मार्गस्थ झाली.

सुनील देवधर यांनी केले यात्रेचे स्वागत

येरवडा कारागृहातून निघालेली यात्रा पुढे डेक्कन येथील सावरकर स्मारकात पोहोचली. त्या ठिकाणी भाजपचे सुनील देवधर, पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्ष विद्याधर नारगोळकर, अनंत पणशीकर आणि चंद्रशेखर साने यांनी यात्रेचे स्वागत केले. या वेळी विमलाबाई गरवारे प्रशालेचे मुख्याध्यापक आणि विद्यार्थीही उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. या यात्रेत सायकल, मोटर सायकल, कार आदी घेऊन शेकडो राष्ट्रभक्त सहभागी झाले होते.

(हेही वाचा – Veer Savarkar : सावरकरांच्या सुटकेमागचा ब्रिटिश शासनाचा दृष्टिकोन)

सावरकरांच्या वसतीगृहातील खोलीत पुष्पांजली

यात्रा फर्ग्युसन महाविद्यालयात (Ferguson College) पोहोचल्यानंतर रणजित सावरकर आणि मंजिरी मराठे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी अभिनेते रणदीप हुडा, अभिनेते शरद पोंक्षे, रणजीत सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे आदी मान्यवरांनी येथील वसतीगृहातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या खोलीत जाऊन पुष्पांजली अर्पण केली.

लघुनाट्य आणि लाठी काठी प्रात्यक्षिके

या कार्यक्रमात ‘जयोस्तुते’ हे गीतगायन झाले. यानंतर शस्त्रे चालवण्याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यामध्ये लाठी-काठी, तलवार, दांडपट्टा आणि अन्य शिवकालीन शस्त्रांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांची नात विनता जोशी यांनी सावरकरलिखित शिवरायांची आरती गायली.

या प्रसंगी सावरकरांच्या कारागृहातील जीवनावर आधारित ‘तपोपूर्ती’ हा नाट्यप्रवेश सादर करण्यात आला. या नाट्यप्रवेशामध्ये संजीत घाटपांडे, कन्हैय्या शाह, प्रज्ञा प्रभुदेसाई, डॉ. मंदार अक्कलकोटकर, रोहन नरके, चिन्मय केसकर, केदार गोडसे, प्रांजल अक्कलकोटकर, ऋत्विक कुलकर्णी, रोहन बावडेकर यांनी सहभाग घेतला.

(हेही वाचा – Veer Savarkar : प्रारंभ ‘समाजक्रांती पर्वा’चा)

या वेळी शिवमुद्रा ढोल पथक, समर्थ प्रतिष्ठान ढोल पथक, विष्णूनाद शंख पथक, लाठी – काठी प्रात्यक्षिक समूह आदींचे सत्कार करण्यात आले. आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी अभिनेते रणदीप हुडा, अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe), रणजित नातु, भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष मेधा कुलकर्णी, स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे (Manjiri Marathe), ब्रिगेडियर हेमंत महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

मुक्ती शताब्दी दिनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या या यात्रेची संकल्पना रणजित सावरकर यांची होती, तर यात्रेचे संपूर्ण नियोजन मंजिरी मराठे यांनी केले. यासाठी संतोष कारकर, सौरभ धडफळे, आशिष जोशी, सचिन गोधानी, रणजीत नातु यांचे सहकार्य लाभले. (Veer Savarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.