Veer Savarkar : मुंबईच्या दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) आयोजित, प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२६ ची अंतिम फेरी, १७ जूनला स्मारकातील सावरकर सभागृहात संपन्न झाली. स्मारकाच्या कोषाध्यक्षा सौ मंजिरी मराठे, स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि हिंदुस्तान पोस्टचे संपादक श्री रणजीत सावरकर आणि सावरकर आय् ए एस् स्टडी सर्कलचे संचालक श्री महेश कुलकर्णी हे यावेळी परीक्षक म्हणून उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये कळव्याच्या भक्ती गवाणकर, यांनी प्रथम पारितोषिक मिळवले. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले, दादरच्या बालमोहन विद्यामंदिरात इयत्ता नववीत शिकणाऱ्या अगस्त्य म्हापणकरने. तर, कियान म्हापणकर, इयत्ता पाचवी, बालमोहन विद्यामंदिर, याला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. यासोबतच, मुंबईच्या वैभव उपासनी आणि अंबरनाथच्या सौ विदुला कुलकर्णी शेट्टीगर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

‘भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतिकारी चळवळ’
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने, ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतिकारी चळवळ’ या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिनही भाषांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा पहिला टप्पा 28 मे या दिवशी संपन्न झाला. त्यानंतर पहिल्या फेरीतून निवड झालेल्या स्पर्धकांची 7 जूनला ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. अखेरीस स्पर्धेचा तिसरा टप्पा 17 जूनला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात पार पडला. ही स्पर्धा सर्व वयोगटातील लोकांसाठी खुली ठेवण्यात आली होती.
स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक विजेत्याला 10,000 रुपये रोख रक्कम, पुस्तके आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा भेट देण्यात आला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांच्या विजेत्यांना पुस्तके आणि पुतळ्यासह, अनुक्रमे 5000 आणि 3000 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. सोबतच दोन उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात आली.
स्वातंत्रवीर सावरकर स्मारकातील ‘आय् ए एस्’ स्टडी सर्कल चे विद्यार्थी श्री अमेय काटदरे, पार्थ राजपूत, प्राप्ती महाडिक आणि दुर्वा गोविलकर यांनी कार्यक्रमामध्ये स्वयंसेवक म्हणून उत्तम कार्य केले. तर, श्री रोहित बामणे, श्री सतीश गरुड यांनी चलचित्रण केले.
Join Our WhatsApp Community

